आयपीएलच्या इतिहासात काही हंगाम वगळता विराट कोहलीच्या RCB संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. अनेकदा हा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरच असतो. यंदाचा आयपीएल हंगाम हा युएईत आयोजित करण्यात आलेला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. RCB चा संघ हा नेहमी विराट आणि एबी डिव्हीलियर्सवरच अवलंबून असतो असं म्हटलं जातं. याच कारणासाठी RCB ने तेराव्या हंगामासाठी संघात काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी होणं RCB साठी गरजेचं बनलं आहे.

अवश्य वाचा – आमचा संघ विराट आणि एबी डिव्हीलियर्सवर अवलंबून नाही – उमेश यादव

१) ख्रिस मॉरिस – २०२० हंगामासाठीच्या लिलावाआधी RCB ने स्टॉयनिस आणि कॉलिन डी-ग्रँडहोम या दोन खेळाडूंना करारमुक्त केलं होतं. त्यामुळे संघात एका अष्टपैलू खेळाडूची गरज होती. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांत योगदान देऊ शकेल असा खेळाडू RCB ला ख्रिस मॉरिसच्या रुपाने मिळाला आहे. ख्रिस मॉरिसच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजीचा विक्रम आहे. त्याने आयपीएल २०१७ मध्ये पुणे संघाविरुद्ध दिल्लीकडून खेळत असताना ९ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३८ धावा फटकावल्या होत्या. यामुळे दिल्लीने २० षटकांत २०५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात आरपीएस संघ केवळ १०८ धावांवर बाद झाला होता.

मॉरिसने आयपीएलमध्ये खेळलेल्या ६१ सामन्यांमध्ये ७.९८ च्या इकॉनॉमी रेटने ६९ बळी मिळवले आहेत आणि फत्यालंदाजीमध्ये त्याने १५७.६२ च्या स्ट्राइक रेटने ५१७ धावा केल्या आहेत. मागचा हंगाम जरी मॉरिससाठी इतका चांगला गेला नसला, तरीही हा खेळाडू आपल्या कामगिरीमुळे संघाला विजयी बनविण्यास सक्षम आहे.

संघातील सहकाऱ्यांसोबत UAE मध्ये सराव करताना मॉरिस (फोटो सौजन्य – RCB)

 

२) अ‍ॅरॉन फिंच – २०१९ विश्वचषकाचं कारण देऊन फिंच आयपीएलच्या गेल्या हंगामात सहभागी झाला नव्हता. पण आयपीएलच्या इतिहासातली फिंचची आतापर्यंतची कामगिरी ही वाखणण्याजोगी राहिलेली आहे. फिंचने आतापर्यंत आतापर्यंत ७५ आयपीएल सामन्यात १३०.६९ च्या स्ट्राईक रेटने एकूण १७३७ धावा केल्या आहेत. फिंच सध्या ऑस्ट्रेलियाच्या वन-डे संघाचा कर्णधार आहे. आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजा दबावात ठेवणं फिंचला चांगलं जमतं. याव्यतिरीक्त फिंच कामचलाऊ गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला फॉर्म कायम ठेवून फिंच यंदा RCB ला विजेतेपद मिळवून देईल अशी संघ व्यवस्थापनाची आशा आहे.

याव्यतिरीक्त फिंच यंदाच्या हंगामात विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यावरचा भार ही हलका करु शकतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : ICC एलिट पॅनलमधील ४ पंच करणार स्पर्धेत काम, भारतीय पंचांचाही समावेश