ICC T20 World Cup 2024 : बीसीसीआयने अखेर जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवडीबाबत सुरू असलेल्या सर्व अटकळांना पूर्णविराम देत बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे, ज्यात काही खेळाडूंच्या पुनरागमनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे, तर काही नव्या स्टार्सनाही संधी मिळाली आहे. या सर्वांशिवाय, काही खेळाडू असे आहेत जे आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करत आहेत, परंतु ते आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकलेले नाहीत. अशा पाच अव्वल खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन ही सर्वात मोठी बाब आहे. युजवेंद्र चहलने संघात शानदार पुनरागमन केले असून शिवम दुबेचा प्रथमच विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांची संघात दोन यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे, तर हार्दिक पंड्या उपकर्णधार म्हणून संघात परतला आहे. बीसीसीआयने शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद या चार खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून सामील केले आहे. आता आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करुनही ज्या ५ अव्वल खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
१. ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स) : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने शानदार कामगिरी करत ९ सामन्यात ४४७ धावा केल्या आहेत. मात्र त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही.
२. साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) : युवा खेळाडू साई सुदर्शननेही या आयपीएल मोसमात खळबळ उडवून दिली आहे. चालू मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ सामन्यात ४१८ धावा करून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. पण टी-२० विश्वचषकासाठीही त्याची निवड झालेली नाही.
३. केएल राहुल (लखनऊ सुपरजायंट्स) : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल या मोसमात शानदार फलंदाजी करत आहे. पण दुखापतीमुळे तो काही काळ राष्ट्रीय संघाबाहेर होता, ज्याचा परिणाम विश्वचषक संघ निवडीवर झाला असावा.
४. अभिषेक शर्मा (सनराईजर्स हैदराबाद) : या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने ९ सामन्यात ३०३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा २१४.८९ चा स्ट्राईक रेट देखील खूप चांगला आहे. पण त्याचे राष्ट्रीय संघात पदार्पण अजून व्हायचे आहे.
हेही वाचा – ICC T-20 World Cup: ऋतुराज, राहुल, श्रेयस आणि शिखर- भारतीय आयपीएल कर्णधार वर्ल्डकपच्या शर्यतीतून बाहेर
५. हर्षल पटेल (पंजाब किंग्स) : गेल्या काही हंगामात आपल्या गोलंदाजीने छाप पाडणारा हर्षल पटेल यावेळीही आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने ९ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट देखील चांगला आहे. मात्र वेगवान गोलंदाजांच्या मुबलकतेमुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही.