Batsman Out On 99 Runs : आयपीएल २०२३ चा थरार उद्यापासून म्हणजेच ३१ मार्चपासून सुरु होणार असून क्रिकेट चाहत्यांची रंगतदार सामने पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्सचा संघ महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरोधात पहिला सामना खेळणार आहे. आयपीएलच्या १६ व्या सीजनचा हा पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी, आयपीएल इतिहासात खेळाडूंना थक्क करणाऱ्या काही गोष्टी घडल्या आहेत. दिग्गज फलंदाज ९९ धावांवर असताना अवघ्या एक धावेसाठी त्यांचं शतक हुलकं आहे. जाणून घेऊयात अशा खेळाडूंबाबत सविस्तर माहिती.
आयपीएलमध्ये अनेक खेळाडू ‘नव्हर्स ९९’ चा शिकार झाले आहेत. टूर्नामेंटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त ५ खेळाडू असे आहेत, जे ९९ धावांवर असताना बाद झाले आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणार पहिला खेळाडू आहे. विराटने आयपीएल २०१३ मध्ये दिल्ली टीमच्या विरोधात ५८ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी शतकासाठी फक्त एका धावेची गरज असताना विराट कोहली धावबाद झाला होता.
दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल २०१९ मध्ये ९९ धावांवर बाद झाला होता. त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात ५५ चेंडूंचा सामना करत ९९ धावांची आक्रमक खेळी केली होती. युनिवर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेल आयपीएल २०२० मध्ये ९९ धावांवर असताना बाद झाला होता. पंजाबकडून खेळताना गेलने राजस्थान रॉयल्स विरोधात झालेल्या सामन्यात ६३ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकार ठोकत ९९ धावा केल्या होत्या. गेलला जोफ्रा आर्चरने क्लीन बोल्ड केलं होतं.
तसंच आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनचंही एका धावेमुळं शतक हुकलं होतं. इशानने आरसीबी विरुद्ध ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकार ठोकून ९९ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाडही आयपीएल २०२२ मध्ये ९९ धावांवर बाद झाला होता. त्याने सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात ५७ चेंडूत ९९ धावा कुटल्या होत्या. त्याने या इनिंगमध्ये ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले होते. टी नटराजनच्या गोलंदाजीवर ऋतुराज बाद झाला होता.