खराब कामगिरीमुळे डच्चू देण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघातील समावेशासाठी मेहनत घेत असलेल्या हरभजन सिंगची अखेर बांगलादेश दौऱयातील कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली. बांगलादेश दौऱया हा माझ्यासाठी एक नवी सुरूवात असल्याची प्रतिक्रिया हरभजनने आपली निवड झाल्याचे समजल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. १० जूनपासून बांगलादेशच्या भूमीवर होणाऱया एकमेव कसोटी सामन्यातून हरभजनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. हरभजन म्हणाला की, बांगलादेश कसोटी माझ्यासाठी नवी सुरूवात असेल. आत्मविश्वासू खेळीने मला माझ्या नव्या इनिंगची सुरूवात करायची असून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील. गेल्या काही वर्षांत मी माझ्या गोलंदाजीवर आणि ज्या गोष्टी सुधारण्याची गरज होती त्यावर भरपूर मेहनत घेतली. माझे हितचिंतक आणि चाहते नेहमी माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले याचे हे फळ आहे. भारतीय संघाच्या जर्सी शिवाय दुसरे काहीच माझ्यासाठी मौल्यवान नाही. गेल्या दोन वर्षांपासून मी भारतीय संघात पुन्हा जागा मिळावी या उद्देशानेच मेहनत घेत होतो, असेही हरभजन पुढे म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is fresh beginning for me says harbhajan singh