भारतीय क्रिकेट क्षेत्राला हादरवणाऱ्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आज आणखी तीन जणांना रविवारी पहाटे पाच वाजता औरंगाबाद येथे अटक केली असून त्यात एका माजी रणजी खेळाडूचा समावेश आहे. अटक केलेल्यातील मनीष गुड्डेवार हा फरिदाबाद येथे राहात असे व अजित चंडिला याच्याबरोबर सराव करीत असे.
मनीष २००३ ते २००५ दरम्यान विदर्भाकडून रणजी सामने खेळलेला आहे. आणखी दोन जणांना यात अटक झाली असून ते नागपूरचे आहेत, त्यात प्रॉपर्टी डिलर व फिक्सर सुनील भाटिया व फिक्सर तसेच बुकी किरण डोळे याचा समावेश आहे. गुड्डेवार हाही नागपूरचा आहे.
पोलिसांनी सांगितले, की अजित चंडिला हा बुकींच्या चार गटांच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांनी मुंबई, चंडीगड, कोलकाता व हैदराबाद येथील हॉटेल्सकडे अजित चंडिला, श्रीशांत व अंकित चव्हाण यांच्या बुकीजबरोबर झालेल्या बैठकांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. पोलीस आता गेल्या गुरुवारी मुंबईतून ११ बुकीजबरोबर अटक केलेल्या खेळाडूंच्या आवाजाचे नमुने गोळा करण्याची परवानगी मागणार आहेत.
मनीष गुड्डेवार
मनीष हा विदर्भ संघासाठी खेळलेला रणजीपटू आहे. ७ सामन्यांत त्याने ११.५०च्या सरासरीने ६९ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर एकमेव बळी आहे. २००४ साली जयपूर येथे राजस्थानविरुद्ध गुड्डेवार पदार्पणाचा सामना खेळला होता. अखेरचा सामना उत्तर प्रदेशविरूद्ध अखेरचा सामना खेळला. मनीष विदर्भाचा क्रिकेटपटू असला तरी त्याची अन्य रणजी संघातील खेळाडूंशी चागली ओळख होती. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेला अजित चंडिला हा त्याचा खास मित्र होता.