आयपीएलच्या धर्तीवर मंगळवारपासून क्वालिफायर लढतींची सुरूवात होणार आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात हवे असलेल्या विस्फोटक आणि दबावाला लिलया पेलणाऱया खेळाडूंची फौज असूनही गेल्या आठ मोसमांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही विजेतेपदाची चव चाखता आलेली नाही. २०११ साली सर्वोत्तम कामगिरी करून विजयाचा वारू डोक्यात गेल्याने बंगळुरूला अंतिम सामन्यात चेन्नई विरुद्धच्या सामन्यात सपाटून मार खावा लागला आणि विजेतेपदाच्या स्वप्नाला पूर्णविराम मिळाला. त्यानंतरच्या मोसमांत गुणतालिकेच्या अगदी रसातळाला घुटमळणाऱया बंगळुरूला यंदा मात्र ‘प्लेऑफ’मध्ये स्थान निश्चित करता आले. या निमित्ताने पुन्हा एकदा बंगळुरूला विजयाची संधील चालून आली आहे. या संधीचे सोने बंगळुरू करेल का? याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागून राहिली आहे.

१. कामगिरीत सातत्य-
यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले. एकूण चौदा सामन्यांपैकी सात सामन्यांत विजय प्राप्त करणारा बंगळुरू संघ १६ गुणांसह तिसऱया स्थानी आहे. मात्र, दोन सामन्यांत पावसाचा फटका बसल्याने बंगळुरूला या दोन्ही सामन्यांत प्रत्येक एक गुण मिळाला. अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱया स्थानावर असलेल्या संघांना मात्र एकदाही पावसाचा फटका बसलेला नाही. त्यामुळे या दोन्ही सामन्यांचे गुण ग्राह्य धरल्यास बंगळुरू गुणतालिकेत अव्वल स्थानावर असता. आता निसर्गाच्या नियमांसमोर इतर कोणतेही नियम नेहमी दुय्यमच हा भाग अलहिदा!

२. फलंदाजांची एकमेकांस पुरक कामगिरी-
ख्रिस गेल नामक एकखांबी विस्फोटक फलंदाजावर बंगळुरूचा धावफलक अवलंबून असल्याचे बोलले जात असले तरी क्विंटन डी कॉक, एबी डिव्लिलियर्स, विराट कोहली आणि सरफराज खान सारख्या युवा खेळाडूंनीही यंदा चांगले योगदान दिले आहे. मस्तमौला फलंदाज एबी डिव्हिलियर्सने यंदाच्या मोसमातील नाबाद १३३ धावांची खेळी साकारली आहे तर, त्यापाठोपाठ ख्रिस गेलची ११७ धावांची आतिषबाजी देखील यंदा पाहायला मिळाली आहे. या महाविरांसोबत राहून सर्फराज खान या युवा पठ्ठयानेही मिळालेल्या संधीचे सोनं करत नाबाद ४५ धावांची विश्वासू खेळी साकारली होती. तर, कोहलीनेही संघाच्या कठीण प्रसंगी कर्णधारी खेळी साकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे एकाकी खेळीवर अवलंबून न राहता यंदा बंगळुरू संघातील प्रत्येक फलंदाजाने चांगले योगदान दिले आहे.

३. मिचेल स्टार्क..गोलंदाजीचा हुकमी एक्का-
मिचेल स्टार्क नामक गोलंदाजीचा हुकमी एक्का बंगळुरूच्या ताफ्यात आहे. बंगळुरूच्या आतापर्यंतच्या विजयात स्टार्कचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. जगातील सध्याचा सर्वात वेगवान आणि यशस्वी गोलंदाज म्हणून स्टार्कचे नाव घेतले जाते. क्लालिफायर लढतीत बंगळुरूची लढत राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. साखळी फेरीत राजस्थान विरुद्धच्या दोन सामन्यांपैकी एक सामना पावसाअभावी पूर्ण होऊ शकला नाही तर, एका सामन्यात मिचेल स्टार्कने घेतलेल्या तीन बळींच्या जोरावर बंगळुरूने राजस्थानला १३० धावांत रोखले होते. तसेच युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने यंदा बंगळुरूकडून चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या फिरकीजादूने संघाचा विश्वासू फिरकीपटू म्हणून ओळख निर्माण करण्यास चहलला यश आले आहे. त्यामुळे या दोन गोलंदाजांची भूमिका पुढील सामन्यांत महत्त्वाची ठरेल.