* अखेरच्या चेंडूवर चेन्नईने साकारला विजय
* बंगळुरुवर चार विकेट्स आणि एक चेंडू राखून मात
* रवींद्र जडेजाच्या नाबाद ३८ धावा विजयात मोलाच्या
* कोहली, डी’व्हिलियर्स यांची अर्धशतकी खेळी व्यर्थ
सामना जवळपास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजुने झुकलेला.. एका षटकांत १६ धावांची आवश्यकता.. पहिल्या दोन चेंडूंवर रवींद्र जडेजाने एक चौकार आणि एक षटकार लगावत सामन्याला कलाटणी दिली.. एका चेंडूत दोन धावांची आवश्यकता असताना रुद्रप्रताप सिंगच्या गोलंदाजीवर थर्ड-मॅनच्या दिशेने जडेजाचा झेल टिपला.. बंगळुरूच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोषही केला.. पण पंचांनी चेंडू नो-बॉल घोषित केल्याने आणि एक धाव पळून काढल्याने चेन्नई सुपर किंग्जने बंगळुरूकडून विजयाचा घास हिरावून घेतला. चेन्नईने थरारक झालेल्या या सामन्यात बंगळुरूवर चार विकेट्सनी विजय साकारला.
 बंगळुरूचे १६६ धावांचे उद्दिष्ट गाठताना चेन्नईला अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर अवघ्या १० धावांमध्ये तंबूत परतल्यानंतर चेन्नईच्या उर्वरित फलंदाजांवरील दडपण वाढले. रवी रामपॉलने यष्टिरक्षक अरुण कार्तिककरवी मुरली विजयला (२) झेलबाद केले. त्यानंतर आर. विनय कुमारने मयांक अगरवालकरवी माईक हसीचा (६) अडसर दूर केला. त्यानंतर सुरेश रैना आणि एस. बद्रीनाथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भर घालत चेन्नईच्या डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. रैनाने २२ चेंडूंत पाच चौकारांसह ३० धावा केल्या. बद्रीनाथने २९ चेंडूंत चार चौकार लगावून ३४ धावा फटकावल्या. पण दोघेही एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी आक्रमक फलंदाजी करून चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. १२ चेंडूंत २९ धावांची आवश्यकता असताना रामपॉलने धोनीला (३३) कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. याच षटकांत रामपॉलने ड्वेन ब्राव्होला बाद केले. पण ख्रिस मॉरीस (नाबाद ७)  आणि जडेजा यांनी अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. जडेजाने २० चेंडूंत तीन चौकार आणि एक षटकारासह नाबाद ३८ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्सची शतकी तसेच त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ८२ धावांची भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ६ बाद १६५ अशी धावसंख्या उभारली. डी’व्हिलियर्सने ३२ चेंडूंत आठ चौकार आणि एक षटकारासह ६४ धावांची घणाघाती खेळी केली. कोहलीने मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत ४७ चेंडूत ५८ धावा फटकावल्या.  
एम.ए. चिदम्बरम स्टेडियमच्या या खेळपट्टीवर बंगळुरू संघ १८० धावांचा टप्पा गाठेल, असे वाटले होते. पण वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसने १७व्या षटकांत दोन विकेट्स मिळवत बंगळुरूच्या फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखले. त्याने ख्रिल गेल आणि कोहलीसारख्या दादा फलंदाजांना बाद केले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ६ बाद १६५ (एबी डी’व्हिलियर्स ६४, विराट कोहली ५८, मयंक अग्रवाल २४ ; ख्रिस मॉरिस ३/४०, आर. अश्विन १/२८)
पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज : १९.५ षटकांत ६बाद १६६
(रवींद्र जडेजा नाबाद ३८, एस. बद्रीनाथ ३४, महेंद्रसिंग धोनी ३३;  सय्यद मोहम्मद २/१५)
सामनावीर: रवींद्र जडेजा
महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार
दौऱ्यावर असताना एका देशाबरोबर एकच ट्वेन्टी-२० सामन्याचे आयोजन होत असल्याने ‘सर’ जडेजा नाराज होते. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलची शक्कल सुचली. त्यामुळे आयपीएलच्या सर्व चाहत्यांनो, सर जडेजा यांचे तुम्ही आभार मानायला हवेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा