वाद हे जरी पाचवीला पुजले असले तरी इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) झिंग क्रिकेटरसिकांमध्ये ओसरलेली नाही. आयपीएलच्या सहाव्या पर्वाला मंगळवारी अतिशय जल्लोषमय वातावरणात होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ होणार आहे. या रंगारंग कार्यक्रमात अनेक बॉलीवूड तारे-तारका आपला जलवा पेश करतील. आंतरराष्ट्रीय रॅपर पिटबुल हा सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
उडणारे ढोलकीवादक, चायनीज तालवादक, फटाक्यांची आणि विद्युतप्रकाशांची सप्तरंगी आतषबाजी याशिवाय शाहरूख खान, कतरिना कैफ आदी कलाकारांच्या अदाकारीने येथील सॉल्ट लेक स्टेडियम न्हाऊन निघणार आहे.
क्रिकेटच्या दुनियेत आयपीएल ही खासगी स्पर्धा आपली यशोगाथा कायम राखत मंगळवारी सहाव्या हंगामाचा जोशपूर्ण प्रांरभ करणार आहे. नऊ संघ चमकणारा आयपीएल चषक जिंकण्यासाठी लढतील. गतविजेतेपदावर नाव कोरणाऱ्या शाहरूख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सच्या यजमानपदाखाली हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. प्रत्यक्ष मैदानावर ईडन गार्डन्सवर बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स दिल्ली डेअरडेव्हिल्सशी आपला सलामीचा सामना खेळणार आहे. याच मैदानावर २६ मे रोजी आयपीएलच्या सहाव्या मोसमाचा विजेता संघ ठरणार आहे.
कराराचा भंग करणाऱ्या डेक्कन चार्जर्सला आयपीएल कार्यकारिणी समितीने निलंबित केल्यानंतर सनरायजर्स हैदराबाद यंदा आपले पदार्पण साजरे करणार आहे. आयपीएल जशी वेगवान क्रिकेटसाठी ओळखले जाते, तसेच वादांसाठी. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच वादाचा धुरळा उडाला आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईत बंदी केल्यानंतर आता भारतातील आणि श्रीलंकेतील वातावरण चांगलेच तापले आहे.
चेन्नई दोन बाद फेरीच्या सामन्यांसहित एकंदर १० सामने होणार आहेत. परंतु आयपीएलच्या कार्यकारिणी समितीने राजकीय दडपणाच्या पाश्र्वभूमीवर तीन कर्णधारांसह श्रीलंकेच्या १३ खेळाडूंना चेन्नई न खेळण्याचे आदेश दिले आहेत. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनने अभिनेता शाहरूख खानवरील वानखेडे स्टेडियममधील बंदी कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवर सुरक्षारक्षकाला मारहाण आणि एमसीए पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संघटेनेने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. दोन वेळा विजेत्या आणि दोन वेळा उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन, मुरली विजय आणि रवींद्र जडेजा हे चार भारतीय खेळाडू चेन्नईचे महत्त्वाचे आधारस्तंभ. नुकताच भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४-० असा ऐतिहासिक विजय मिळवला. या चौघांनी भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
पहिल्या तीन हंगामांमध्ये वादाशी हातात हात घालून वावरणाऱ्या शाहरूखच्या कोलकाता संघाचा गौतम गंभीरवर विश्वास आहे. वेस्ट इंडिजचा जादूई फिरकी गोलंदाज सुनील नरिनने गेल्या हंगामात वर्चस्व गाजवले होते. याशिवाय जॅक कॅलिस, ब्रेंडन मॅक्क्युलम, रजत भाटिया, मनोज तिवारी आणि लक्ष्मी रतन शुक्ला हे खेळाडू कोलकाता संघात आहेत. ‘कोरबो, लोरबो, जीतबो रे..’चा नारा जपत कोलकाता संघ जेतेपद पुन्हा राखण्यासाठी सज्ज झाला आहे. वसिम अक्रमच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीच्या मार्गदर्शनाची धुरासुद्धा ब्रेट लीकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय लंकेचा ऑफ-स्पिनर सचित्र सेनानायके आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू रियान मॅकलारेन हे नवे चेहरे कोलकात्याच्या संघात सामील झाले आहेत.
याशिवाय दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेला मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी आतुर आहे. रिकी पाँटिंगकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकरसोबत त्याचा खेळ कसा साकारेल, ही सर्वानाच उत्सुकता आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल काय कमाल करतो, याचीसुद्धा जोरदार चर्चा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2013 रोजी प्रकाशित
ढोल बजने लगा..!
वाद हे जरी पाचवीला पुजले असले तरी इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) झिंग क्रिकेटरसिकांमध्ये ओसरलेली नाही. आयपीएलच्या सहाव्या पर्वाला मंगळवारी अतिशय जल्लोषमय वातावरणात होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ होणार आहे.

First published on: 02-04-2013 at 03:19 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today opening ceremony of ipl