आतापर्यंत चार पराभव स्वीकारणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागणार आहे. हा सामना येथे बुधवारी होत आहे. मुंबईलाही लागोपाठ तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
विश्वविक्रमी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या वाढदिवशी उद्या येथे मुंबईचा संघ विजय मिळविण्यासाठी उत्सुक झाला आहे. सचिनने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ४७ चेंडूंत ५४ धावा करीत आपण अजूनही अव्वल दर्जाचे फलंदाज आहोत हे दाखवून दिले आहे. त्यामुळेच येथील प्रेक्षक कोलकाताप्रमाणेच सचिनच्या संघालाही प्रोत्साहन देतील असा अंदाज आहे. किंग्ज इलेव्हन, चेन्नई सुपरकिंग्ज यांच्याकडून पराभव स्वीकारल्यामुळे कोलकाता संघाचा बाद फेरीतील प्रवेश अनिश्चित झाला आहे. मुंबईची स्थिती काही वेगळी नाही. राजस्थान व दिल्ली यांच्याविरुद्धचे सामने गमावल्यामुळे त्यांना आता बाद फेरीतील प्रवेशाकरिता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.
कोलकाता संघापुढे फलंदाजीतील सातत्याच्या अभावाची समस्या प्रकर्षांने जाणवत आहे. त्यांचे फलंदाज शालेय स्तरावरील क्रिकेट खेळत असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. गौतम गंभीर, जॅक्वीस कॅलीस, इऑन मोर्गन, सुनील नरेन व सचित्र सेनानायके हे पाच खेळाडू वगळता अन्य खेळाडूंनी सातत्याचा अभावच दाखवला आहे. कोणाला स्थान द्यावयाचे व कोणाला विश्रांती द्यायची हाच त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. युसूफ पठाण, मनोज तिवारी, देवव्रत दास व रजत भाटिया यांचीही कामगिरी सुमारच झाली आहे.
मुंबईला गोलंदाजांच्या अपयशाची डोकेदुखी जाणवत आहे. त्यामुळेच वीरेंद्र सेहवागला चौफेर टोलेबाजी करण्याची संधी साधता आली होती. तब्बल दहा लाख डॉलर्सची बोली लावून विकत घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेल याला अद्याप कौशल्य दाखविण्याची संधीच मिळालेली नाही. रणजीच्या अंतिम सामन्यात नऊ बळी घेणाऱ्या धवल कुलकर्णी या घरच्या गोलंदाजास मुंबईचे व्यवस्थापन विसरले असावे अशी टीका होत आहे. त्याला येथे संधी मिळालेली नाही. लसित मलिंगा, मुनाफ पटेल व जसप्रीत बुमराह यांना अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आलेला नाही. अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज हरभजनसिंग याला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे प्रग्यान ओझा याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
सामन्याची वेळ : रात्री आठ वाजल्यापासून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा