चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज फलंदाजांची सनरायजर्स हैदराबादच्या भेदक माऱ्यासमोर अग्निपरीक्षा ठरणार आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वामध्ये गुरुवारी हे दोन तगडे दाक्षिणात्य संघ प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांच्या खात्यावर सात सामन्यांत प्रत्येकी पाच विजय जमा आहेत. परंतु धावगतीच्या आधारे चेन्नईचा संघ दुसऱ्या तर हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादला सतावते आहे ती फलंदाजीची चिंता. त्यामुळे चेन्नईचे पारडे किंचित जड आहे.
हैदराबादची प्रमुख मदार आहे ती गोलंदाजीवर. जागतिक क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज डेल स्टेनकडे त्यांच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व आहे. याशिवाय इशांत शर्मा, थिसारा परेरा आणि लेग स्पिनर अमित मिश्रा असा वैविध्यपूर्ण मारा हैदराबादकडे आहे. हैदराबादच्या आतापर्यंतच्या पाच विजयांमध्ये या गोलंदाजांचे प्रमुख योगदान आहे.
फलंदाजीचाच विचार केल्यास कप्तान कुमार संगकारा अजूनही आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी दाखवू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून व्हाइटचीही तीच स्थिती आहे. धडाकेबाज फलंदाज शिखर धवन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे परेराच्याच खांद्यावर फलंदाजीचे ओझेसुद्धा आहे. आघाडीच्या फळीत पार्थिव पटेल आणि डी.बी. रवी तेजा हे फलंदाज त्यांच्याकडे आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळविल्यावर आठवडय़ाभराच्या विश्रांतीनंतर हैदराबादचा संघ गुरुवारी सामना खेळणार आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्जचा संघ मात्र अविरत सामने खेळत आहे. दोन वेळा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या चेन्नईची फलंदाजीची फळी बलवान आहे. राजस्थान रॉयल्सचे अवघड आव्हानसुद्धा त्यांनी सहजपणे पेलले होते.
फॉर्मात असलेल्या मायकेल क्लार्ककडे सामन्याच्या निकालाला कलाटणी देण्याची क्षमता आहे. सुरेश रैना आणि कप्तान महेंद्रसिंग धोनी सातत्याने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करीत आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा बहारदार कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. गोलंदाजीत ऑफ-स्पिनर आर. अश्विनवर त्यांच्या फिरकीची धुरा आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज
माझा फोन अजूनही घणाणतो आहे आणि आता पहाटेचे ४. वाजून ६ मिनिटे झाली आहेत. आता मी झोपायचा प्रयत्न करतोय, जेव्हा उठेन तेव्हा तुम्हा साऱ्यांशी बोलेन. मला शुभेच्छा देणाऱ्या साऱ्यांचे आभार!!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा