Performance Of Top 10 Costliest Players In IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेने केवळ भारतालाच नव्हे, तर जगातील इतर संघांनाही उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू दिले आहेत. असे अनेक खेळाडू आहेत, जे एक हंगाम खेळून पुढे राष्ट्रीय संघासाठी निवडले गेले आहेत. या हंगामातही युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे. विग्नेश पुथुर, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे यांसारख्या युवा खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. मात्र, कोटींची बोली लागलेल्या खेळाडूंना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. कशी राहिली आहे आयपीएल २०२५ स्पर्धेतील सर्वांत महागड्या अग्रगण्य अशा १० खेळाडूंची कामगिरी? जाणून घ्या.
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक भाव खाल्ला. रिषभ लिलावात येताच, फ्रँचायजींनी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पैशांचा पाऊस पाडला. त्याच्यावर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली लागली. लखनऊ सुपर जायंट्सने रिषभला २७ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. तसेच त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही सोपवली. लखनऊचा संघ चांगली कामगिरी करतोय; मात्र रिषभ पंत २७ कोटी रुपयांना न्याय देऊ शकलेला नाही. त्याला फलंदाजीत नऊ सामन्यांमध्ये केवळ १०६ धावा करता आल्या आहेत.
श्रेयस अय्यर या लिलावातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला. गेल्या हंगामात केकेआरला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयसने संघाची साथ सोडून लिलावात येण्याचा निर्णय घेतला होता. लिलावात त्याला चांगलाच भाव मिळाला. पंजाब किंग्जने त्याच्यावर २६.७५ कोटींची बोली लावली. तो या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वांत महागडा खेळाडू ठरला. श्रेयसने आपल्या नेतृत्वाने आपल्या फलंदाजीने पंजाब किंग्जला पैसा वसून करून दिला. पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत १० गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तसेच त्याच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये २६३ धावा कुटल्या आहेत.
या हंगामातील तिसरा सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या वेंकटेश अय्यरने आपल्या फॅन्सला निराश केले. केकेआरने श्रेयस अय्यरला सोडून मोठी किंमत मोजली आणि वेंकटेश अय्यरला संघात स्थान दिले. केकेआरने त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी २३.७५ कोटी मोजलेC मात्र या मानधनाला साजेशी कामगिरी तो करू शकलेला नाही. त्याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, ही जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली. वेंकटेश अय्यरच्या कामगिरीबद्दल बोलायचे, तर त्याला आठ सामन्यांमध्ये अवघ्या १३५ धावा करता आल्या आहेत.
चहल, अर्शदीपने मैदान गाजवलं…
पंजाब किंग्जने अर्शदीप सिंगला १७ कोटी मोजत पुन्हा एकदा आपल्या संघात घेतले. त्यासह युजवेंद्र चहललाही संघात घेण्यासाठी १८ कोटी मोजले. या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे. चहलने या हंगामात नऊ गडी बाद केले आहेत; तर अर्शदीप सिंगने ११ गडी बाद केले आहेत.
तर अग्रगण्य १० महागड्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानी असलेल्या जोस बटलरला गुजरात टायटन्सने १५.७५ कोटी मोजून आपल्या संघात स्थान दिले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत ३५६ धावा केल्या आहेत. के. एल. राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी मोजून आपल्या संघात घेतले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत ३२३ धावा कुटल्या आहेत. १२.५० कोटी बोली लागलेल्या ट्रेंट बोल्टने या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना सहा गडी बाद केले आहेत. तर, १२.५० कोटींची बोली लागलेल्या जोफ्रा आर्चरने या हंगामात आठ गडी बाद केले आहेत. अग्रगण्य १० महागड्या खेळाडूंच्या यादीत शेवटी असलेल्या जोश हेझलवूडवर १२.५० कोटींची बोली लावली गेली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना त्याने आतापर्यंत १२ गडी बाद केले आहेत.