IPL 2025 Why Travis Head Glenn Maxwell and Marcus Stoinis Fight: पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. पंजाब-हैदराबाद सामन्याच धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळालं. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात अभिषेक शर्माने १४१ धावांची ऐतिहासिक खेळी खेळली आणि २४६ धावांचे लक्ष्य सहज गाठत हैदराबादने दणदणीत विजय मिळवला. पण अभिषेक शर्माच्या शतकाव्यतिरिक्त, हा सामना तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंमधील वादामुळे देखील लक्षात राहील.
ट्रॅव्हिस हेड हा ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस यांच्यात भर मैदानात वाद घालताना दिसला. ट्रॅव्हिस हेड हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. तर मॅक्सवेल आणि स्टॉयनिस दोघेही पंजाब किंग्स संघातून खेळतात. हे तिन्ही खेळाडू एकमेकांविरूद्ध खेळत होते तर वादही घालताना दिसले. नवव्या षटकात त्याचे सहकारी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस यांच्यातील वादाबद्दल सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने खुलासा केला आहे.
हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड वादळी फटकेबाजी करत होते. डावाच्या नवव्या षटकात ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजीसाठी आला होता. षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर हेडने मॅक्सवेलला सलग दोन षटकार मारले, ज्यामुळे मॅक्सवेल निराश झाला. दोन षटकार मारल्यानंतर, मॅक्सवेल ट्रॅव्हिस हेडला काहीतरी बोलला.
षटक पूर्ण झाल्यानंतर, हेडने सूड घेतला आणि मॅक्सवेलकडे गेला आणि त्याला उत्तर दिलं. अशातच दोन्ही ऑस्ट्रेलियन दिग्गजांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. मैदानी पंच पुढे येऊन हस्तक्षेप केल्यानंतर दोघांमधील वाद थांबला. यानंतर लगेच पंजाब संघाचा दुसरा खेळाडू मार्कस स्टॉयनिसही वाद घालण्यासाठी पुढे आला.
सामन्यानंतर वादाबाबत सांगताना हेड म्हणाला, जेव्हा तुम्ही एखाद्याला इतकं चांगलं ओळखता तेव्हा तुम्ही एकमेकांमधील चांगल्या आणि वाईट गुणांबद्दल बोलून जाता. फार काही गंभीर नाहीये, फक्त थोडीशी थट्टा मस्करी होती. आमच्यासाठी तो एक खास दिवस होता. आम्हाला या विजयाची गरज होती. आम्ही आमचं काम अर्ध्या वेळेत पूर्ण केलं. आम्ही स्वतःला संधी दिली, सुरुवातीला थोडा जास्त संयम दाखवला. आम्हाला माहित होतं की ते कोणत्या रणनितीसह उतरणार आहेत. आम्ही स्वतःला आणखी थोडा वेळ दिला आणि चांगली सुरुवात केली.
पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लक्ष्याचा पाठलाग करताना आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. त्याआधी, पंजाबने कर्णधार श्रेयस अय्यरच्या ३६ चेंडूंत सहा षटकार आणि तितक्याच चौकारांसह ८२ धावांच्या खेळीच्या मदतीने सहा विकेट गमावून २४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, अभिषेक (१४१ धावा, ५५ चेंडू, १४ चौकार, १० षटकार) आणि हेड (६६ धावा, ३७ चेंडू, नऊ चौकार, तीन षटकार) यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीच्या जोरावर सनरायझर्सने १८.३ षटकांत २ गडी गमावून २४७ धावा करून सामना जिंकला.