KKR Captain Nitish Rana’s Wife Sachi Marwah: क्रिकेटर नितीश राणाची पत्नी साची मारवाहशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. खुद्द साची मारवाहने याबाबत आपल्या इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. प्रत्यक्षात दिल्लीतील दोन मुलांनी तिचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि नंतर तिच्या कारला धडक दिली. हा सर्व प्रकार गुरुवारी रात्री घडला. याप्रकरणी क्रिकेटरच्या पत्नीने दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोपही केला आहे.
सध्या दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. १८ वर्षीय आरोपी चैतन्य शिवम हा पांडव नगरचा रहिवासी असून विवेक पटेल नगरचा रहिवासी आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, ही मुले त्यांच्या मागे का लागली होती, हे अद्याप समजू शकलेले नाही.
साची कामावरून परतत असताना केला पाठलाग –
पोलिसांनी सांगितले की, नितीश राणाची पत्नी साची मारवाह ही नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत होती. त्यावेळी कीर्तीनगरमध्ये दोन जण तिचा पाठला करु लागले. ते तिच्या कारच्या शेजारी दुचाकीवर आले आणि कारला धक्का देऊ लागले. त्यानंतर साचीने दोन्ही मुलांचा व्हिडिओ बनवला. तिने आपल्या सोशल मीडियावर दोन्ही मुलांचे फोटो शेअर केले आहेत. या प्रकरणात साचीने दिल्ली पोलिस लक्ष देत नसल्याचा आरोप केला होता. साची म्हणाली की, तिने पोलिसांना तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. तेव्हा पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. तसेच तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात, त्यामुळे आता जाऊ द्या, असे सांगितले.
हेही वाचा – IPL 2023 LSG: करुण नायरला दुसरी संधी मिळताच व्हायरल झाले जुने ट्विट, जाणून घ्या काय आहे?
साचीचा पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप –
साचीने तिच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीतील रोजच्या दिवसाप्रमाणे मी कामावरून घरी जात होते. यानंतर या दोघांनी विनाकारण माझ्या गाडीला टक्कर देण्यास सुरुवात केली. बराच वेळ ते माझा पाठलाग करत होते. जेव्हा मी दिल्ली पोलिसांना फोन केला, तेव्हा मला फोनवर सांगण्यात आले की, ‘आता तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात, आता जाऊ द्या! पुढच्या वेळी नंबर लिहून ठेवा.” साचीच्या सोशल मीडियानुसार, ती एक आर्किटेक्चरल डिझायनर आहे. तिने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणासोबत लग्न केले आहे.