Virender Sehwag On Ishan Kishan Wicket: आयपीएल २०२५ स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इशान किशनच्या विकेटवरून चांगलाच राडा झाला. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झालेला नसताना इशान किशनने पॅव्हेलियनची वाट धरली. खेळभावना दाखवल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी इशान किशनचं कौतुक केलं. पण, क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनी इशान किशनवर जोरदार टिका केली आहे.
वीरेंद्र सेहवागने घेतली इशान किशनची शाळा
हैदराबाद आणि मुंबई सामना झाल्यानंतर क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवागने इशान किशनची चांगलीच शाळा घेतली. तो म्हणाला,” इशान किशनने आपलं डोकं वापरायला हवं होतं. जर अंपायरने त्याला आऊट घोषित केलं असतं, तर त्याच्याकडे डिआरएस घेण्याची संधी होती. मात्र अशावेळी डोकं काम करणं बंद करतं”, असं सेहवाग म्हणाला.
तसेत तो पुढे म्हणाला, “इशान किशनने तिथेच थांबायला हवं होतं. त्याने काही वेळ थांबून अंपायरच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. अंपायर्सलाही पैसे मिळतात, त्यांना त्यांचं काम करू द्यायला हवं होतं.” सेहवागच्या मते, इथे पूर्णपणे चूक ही इशान किशनची होती. त्याने विकेट फेकून जायला नको होतं. त्याने अंपायरच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. कारण चेंडू टाकताच अंपायरने वाईड चेंडू देण्यासाठी हात वर केले होते. इशानला जाताना पाहून त्यांनी आपला निर्णय बदलला.
नेमकं काय घडलं?
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला. इशान किशन स्ट्राइकवर असताना तिसरे षटक टाकण्यासाठी दीपक चाहर गोलंदाजीला आला. दीपक चाहरने चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकला. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाडूने अपील केली नाही. ना गोलंदाज, ना यष्टीरक्षक कोणीच अपील केली नाही. मात्र तरीही इशान किशनने पॅव्हेलियनची वाट धरली. त्याला बाहेर जाताना पाहून अंपायरने त्याला बाद घोषित केलं.