Sanju Samson Creates Record Against CSK: आयपीएल २०२३ चा ३७ वा सामना गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा ३२ धावांनी पराभव केला. राजस्थानचा या मोसमातील चेन्नईवरचा हा दुसरा आणि सलग चौथा विजय आहे. यासह आरआरचा कर्णधार संजू सॅमसनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला सर्वाधिक सलग सामन्यात पराभूत करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सॅमसन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने २०२१ ते २०२३ दरम्यान एकूण ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला, तर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने २०१८ ते २०१९ दरम्यान सलग ५ वेळा सीएसकेचा पराभव केला. या मोसमात जर आरआर आणि सीएसके किमान एकदा तरी प्लेऑफमध्ये भेटले आणि संजू सॅमसनने पुन्हा एकदा धोनी ब्रिगेडला पराभूत केले तर तो रोहित शर्माची बरोबरी करेल.
सीएसके विरुद्ध सर्वाधिक सलग सामने जिंकणारे कर्णधार –
५ – रोहित शर्मा (२०१८/१९)
४- संजू सॅमसन (२०२१/२३)*
३ – रोहित शर्मा (२०१५)
३ – जॉर्ज बेली (२०१४)
३ – श्रेयस अय्यर (२०२०/२२)
३ – अनिल कुंबळे (२००९/१०)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना कसा होता?
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या ७७ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर संघाला २०२ धावांपर्यंत मजल मारता आली. या धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसके संघाला निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून केवळ १७० धावा करता आल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने अर्धशतक झळकावले, तर ऋतुराज गायकवाडने ४७ धावांची खेळी केली. त्याचवेळी राजस्थानकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक तीन बळी घेतले.