Vaibhav Suryavanshi IPL Debut at 14 Years: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन या सामन्यात गेल्या सामन्यातील दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. संजू सॅमसनच्या जागी रियान पराग पुन्हा राजस्थानचे नेतृत्त्व करणार आहे. याचबरोबर संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळणार आहे.

आयपीएल २०२५ च्या लिलावात यंदा १४ वर्षीय भारतीय खेळाडू सामील झाला होता. राजस्थान रॉयल्सने या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात सामील केले होते. आता वैभव सूर्यवंशीला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. यासह वैभवने पदार्पणा करताच एक मोठा इतिहास घडवला आहे.

आयपीएल २०२५ च्या ३६ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला या लीगमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यासह, तो आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. डावखुरा फलंदाज वैभवने वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळाली आहे. वैभवचं वय फक्त १४ वर्ष आणि २३ दिवस आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर संजू सॅमसनच्या जागी रियान पराग नाणेफेकीसाठी आला. लखनौने नाणेफेक जिंकली, पण त्याने संघातील बदलांची घोषणा करताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. रियानने घोषणा केली की वैभव सूर्यवंशी या सामन्यात पदार्पण करेल. यासह, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला आहे.

कोण आहे वैभव सूर्यवंशी? (Who is Vaibhav Suryavanshi)

वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या समस्तीपूर येथील खेळाडू आहे, वैभव सूर्यवंशी १४ वर्षांचा आहे. या तरुण वयात त्याने रणजी करंडक, हेमंत करंडक, कूचबिहार करंडक आणि विनू मांकड ट्रॉफी खेळली आहे. अलीकडेच त्याची भारतीय अंडर-१९ संघातही निवड झाली होती.

वैभव सूर्यवंशीने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, त्याचे वडील संजीव यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वैभवला नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यासाठी वडिलांनी घरी जाळी बसवली होती. रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात वैभवला बिहारकडून पदार्पणाची संधी मिळाली. वैभवने अवघे १२ वर्षे आणि २८४ दिवस वय असताना पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. त्याच वर्षी, वैभव सूर्यवंशीने बिहार क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-१९ वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावले होते. अंडर-१९ स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिले त्रिशतकही ठरले.