आयपीएल २०२५ मध्ये भारताच्या अनकॅप्ड युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आहे तर १७ वर्षीय आयुष म्हात्रे आणि ३४ वर्षीय प्रियांश आर्य यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. दरम्यान आयपीएलनंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी या खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका जूनमध्ये सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडिया इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्याच वेळी, भारताचा अ संघदेखील इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएलनंतर भारताचा अंडर-१९ संघही इंग्लंडचा दौरा करणार आहे. संघ तिथे ५ एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळेल.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ २१ जून रोजी ब्रिटनला पोहोचेल. यादरम्यान भारतीय महिला संघ आणि भारतीय मिस्क्ड दिव्यांग संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर असतील. या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या काही आयपीएल स्टार्सना अंडर-१९ संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे यांना इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या अंडर-१९ संघात स्थान मिळू शकते. हे दोन्ही फलंदाज सध्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहेत. वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने फक्त ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. तर सीएसकेचा फलंदाज आयुष म्हात्रेने दोन आयपीएल सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ३२ धावांची खेळी खेळली. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो ३० धावा करून बाद झाला.

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय अंडर-१९ संघाकडून खेळला आहे. त्याने या संघाविरुद्ध शतकही केले. याशिवाय वैभव आणि आयुष म्हात्रे यांनी १९ वर्षांखालील आशिया कपमध्येही भाग घेतला होता. दोघेही टीम इंडियाचे सलामीवीर होते. म्हात्रे आणि सूर्यवंशी दोघांनीही आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतरच त्यांच्या संघात निवडीच्या बातम्या येत आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे अंडर-१९ विश्वचषक पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे.

भारताच्या अंडर-१९ संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना: २७ जून, होव्ह
दुसरा एकदिवसीय सामना: ३० जून, नॉर्थम्प्टन
तिसरा एकदिवसीय सामना: २ जुलै, नॉर्थम्प्टन
चौथा एकदिवसीय सामना: ५ जुलै, वॉर्सेस्टर
पाचवा एकदिवसीय सामना: ७ जुलै, वॉर्सेस्टर
पहिला कसोटी सामना: १२-१५ जुलै, ठिकाण निश्चित नाही दुसरा कसोटी सामना: २०-२३ जुलै, चेम्सफोर्ड