Vaibhav Suryavanshi World Records : इंडियन प्रीमियमर लीगमध्ये सोमवारी (२८ एप्रिल) रात्री राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्याद्वारे भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर नवा सूर्य उगवला आहे. वैभव सूर्यवंशी असं त्याचं नाव असून त्यने कालच्या सामन्याद्वारे जगाला त्याची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. या १४ वर्षीय क्रिकेटपटूने गुजरातविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली. केवळ आयपीएलच नव्हे तर त्याने टी-२० क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक खेळी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावून त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावत विश्वविक्रम केला. त्याच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर १५.५ षटकांत २१२ धावा करत विजय मिळवला.

“वैभव अशी खेळी करण्याचा मनसुबा आखूनच मैदानात उतरला होता”, असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितलं आहे. ओझा म्हणाले, “सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मला वैभवचा फोन आला. फूटवर्क व फलंदाजीच्या तंत्राबद्दल आम्ही काही वेळ चर्चा केल्यानंतर वैभव खूप आत्मविश्वासाने म्हणाला, सर, आज मैं मारुंगा (सर, आज मी मारणार). यावर मी त्याला म्हटलं, मार, पण लवकर बाद होऊ नकोस. शांत चित्ताने फलंदाजी कर. यशस्वीबरोबर बोलत राहा.”

वैभव सूर्यवंशीची प्रशिक्षक नेमकं काय म्हणाले?

त्यानंतर रात्री वैभवने मैदानात काय केलं ते सगळ्यांनी पाहिलंच आहे. रात्री तो जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर उतरला अन् पहिल्या चेंडूपासूनच त्याने गोलंदाजांवर आक्रमण केलं. तब्बल ११ षटकार व ७ चौकारांच्या सहाय्याने त्याने शतकी खेळी साकारली. इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, राशिद खान, करीम जनत या सर्वच गोलंदाजांची त्याने धुलाई केली.

ओझा म्हणाले, “वैभव मला म्हणाला होता की मारेन, पण तो अशा पद्धतीने मारेल असं वाटलं नव्हतं. मला असं वाटत होतं की हा (वैभव) आज काहीतरी मोठं करणार हे नक्की आहे. परंतु, मी प्रामाणिकपणे सांगेन की इतकी मोठी ऐतिहासिक कामगिरी करेल असं वाटलं नव्हतं. तो केवळ १४ वर्षांचा आहे. मात्र देवाने त्याला अफाट प्रतिभा दिली आहे. त्याच्या या कारकिर्दीत मला छोटीशी भूमिका बजावता आली त्याबद्दल मी देवाचा खरोखर आभारी आहे.”