IPL 2025 Vaibhav Suryavanshi Cried After Getting Out on Debut Video: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल पदार्पणताच षटकार लगावत सर्वांच लक्ष वेधून घेतलं. आयपीएल लिलावात वैभवला राजस्थान रॉयल्सने १.१ कोटींना संघात सामील केलं, पण त्याला पदार्पणाची संधी कधी देणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. अखेरीस वैभवला राजस्थानने लखनौविरूद्ध सामन्यात पदार्पणाची संधी दिली आणि त्याने या संधीचा फायदा करून घेत वादळी खेळी केली. पण बाद झाल्यानंतर तो माघारी परतताना रडताना दिसला. संजू सॅमसन दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने वैभव सूर्यवंशीला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. वैभवने वयाच्या १४व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरला. यासह पहिल्याच सामन्यात सर्वांच्या नजरा साहजिकच वैभववर होत्या आणि त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत त्याने सर्वांची मनं जिंकली. वैभवच्या षटकाराने सर्वांनाच धक्का दिला. वयाच्या १४ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या फलंदाजाकडून, तेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव असलेल्या शार्दुल ठाकूरविरुद्ध, पहिल्याच चेंडूवर असा फटका मारण्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. यासह, तो आयपीएलमध्ये षटकार मारणारा सर्वात तरुण फलंदाज बनला.
पुढच्याच षटकात त्याने अवेश खानच्या चेंडूला लॉन्ग ऑनच्या बाहेर षटकार लगावला. आयपीएलमधील हा त्याचा फक्त तिसरा चेंडू होता. यानंतर फिरकीपटू आल्यावर वैभवचा डिफेन्सही पाहण्याची संधी मिळाली. संपूर्ण सामन्यात वैभवने फटकेबाजी आणि सावध फलंदाजीचा योग्य मेळ साधला आणि अजून एक चांगला क्रिकेटपटू तयार होत असल्याची त्याने हमी दिली.
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला कमालीची सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली होती. ९व्या षटकात एडन मारक्रम फलंदाजीला आला आणि चौथ्या चेंडूंवर ऋषभ पंतने वैभवला स्टम्पिंग करत बाद केलं. यासह वैभवची महत्त्वपूर्ण वादळी खेळीला पूर्णविराम लागला. वैभवने पदार्पणात २० चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. पण बाद झाल्यानंतर तो माघारी परतताना आपले अश्रू पुसताना दिसला. त्याच्या रडतानाचे फोटो, व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd