IPL 2025 Vaibhav Suryavanshi Hits First Ball Six: वैभव सूर्यवंशी… १४ वर्षीय भारतीय फलंदाजाने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वैभव सूर्यवंशी १४ वर्षाचा मुलगा असल्याने त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. तो आयपीएलमध्ये कसा खेळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत आयपीएलमध्ये आपल्या आगमनाचा डंका वाजवला आहे.

वैभव सूर्यवंशीने वयाच्या १४ व्या वर्षी क्रिकेटच्या जगात इतिहास रचला आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या वैभव वय वर्ष केवळ १४ वर्षे आणि २७ दिवस असताना आयपीएलमध्ये पदार्पण करून मोठा पराक्रम केला आहे. वैभवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार मारून क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले आहे.

राजस्थानच्या घरच्या मैदानावर म्हणजेच जयपूरमध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने १४ वर्षे आणि २३ दिवसांच्या वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनला. त्याने प्रयास रे बर्मनचा विक्रम मोडला. ज्याने १६ वर्षे १५७ दिवस वय असताना बंगळुरूसाठी पदार्पण केले. पण वैभव फक्त हा विक्रम मोडून समाधानी नव्हता. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे.

वैभव सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला उतरला. पहिलं षटक शार्दुल ठाकूरने टाकलं आणि पहिले तीन चेंडू यशस्वी जैस्वालने खेळले. चौथ्या चेंडूवर वैभवला संधी मिळाली. अर्थात, या डावात सर्वांच्या नजरा वैभववर होत्या, ज्याने त्याच्या मोठ्या खेळींमुळे आधीच स्वतःचे नाव कमावले होते. पण तो आयपीएलची सुरुवात अशी करेल असं क्वचितच कोणी विचार केला असेल.

शार्दुलच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, वैभवने जागा बनवत लेग स्टंपकडे गेला आणि पूर्ण ताकदीने बॅट स्विंग केली. चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि थेट कव्हर्सवरून सीमारेषेवर गेला आणि षटकार खेचला.

आयपीएलमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार लगावणारे फलंदाज

रॉब क्विनी (राजस्थान रॉयल्स)
केव्हॉन कूपर (राजस्थान रॉयल्स)
आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
कार्लोस ब्रॅथवेट (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
अनिकेत चौधरी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
जावोन सेर्ल्स (कोलकाता नाईट रायडर्स)
सिद्धेश लाड (मुंबई इंडियन्स)
महेश थेक्षाना (चेन्नई सुपर किंग्स)
समीर रिझवी (चेन्नई सुपर किंग्स)
वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)