Vaibhav Suryavanshi’s Father: भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये ऐतिहासिक खेळी केली आहे. फक्त आयपीएलचं नव्हे तर त्याने टी-२० क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक खेळी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावून त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत आपलं शतक झळकावत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूवर षटकार मारत हिरो ठरला होता. पण वैभव जेव्हा आऊट झाला तेव्हा तो रडत होता. त्यावेळी बऱ्याच जणांनी त्याची खिल्ली उडवली. पण त्यावेळी उगाच रडला नव्हता, तर त्याला आपल्या शेतकरी वडिलांचा त्याग माहिती होता. या अश्रूंच्या मागे त्याच्या वडिलांचा प्रचंड संघर्ष लपला होता. आयपीएलमधील एक मोठा भारतीय रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. ज्या वयात मुलं शाळेचा गृहपाठ करतात, टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहून आवडत्या खेळाडूंच्या स्टाईलची घरात कॉपी करत सर्वांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात त्या वयात वैभवनं हा पल्ला गाठला आहे.
आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ३ वर्षांनी वैभवचा जन्म
आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ३ वर्षांनी वैभवचा जन्म झाला. बिहारमधील समस्तीपूर हे वैभवचं गाव. त्याला त्याचे वडिल संजीव सूर्यवंशी यांनीच क्रिकेटच्या मैदानावर आणलं. संजीव यांचंही क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं. परिस्थितीमुळे ते स्वप्न पूर्ण झालं नाही. पण, मुलाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही, असा त्यांनी ठाम निश्चय केला होता.
पाचव्या वर्षापासूनच वैभवनं क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली. त्याची क्रिकेटमधील प्रगती झपाट्यानं होत होती. त्यानंतर तो १० वर्षांचा असताना त्याला पाटणामध्ये आठवड्यातून तीन दिवस क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी नेण्यास संजीव यांनी सुरुवात केली.
शेतकरी बापाचा प्रचंड त्याग
वैभवला क्रिकेटपटू घडवणं हेच त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. घरातील परिस्थिती बेताची. अखेर संजीव सूर्यवंशी यांनी स्वत:ची जमीन विकली. एवढंच नाहीतर ते बेरोजगार झाले. त्यानंतरही त्यांनी वैभवच्या सरावात खंड पडू दिला नाही. पटणामध्ये १० व्या वर्षी नेट प्रॅक्टीस करताना इतर मुलं साधारण रोज १०० बॉल खेळत. मात्र तोच वैभव रोज ६०० बॉल खेळत असे. १६-१७ नेट बॉलर्स त्याला बॉलिंग करत. या सर्वांसाठी रोज १० डबे त्याच्यासाठी वैभवचे वडील घेऊन येत. वैभवची आई रोज पहाटे उठून हा सारा स्वयंपाक करत असे. आई-वडिलांच्या या कष्टाचं चीज वैभवनं केलं. तो १३ व्या वर्षीच अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारताकडून खेळला. बिहारकडून रणजी स्पर्धेत खेळला. १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा रेकॉर्ड त्यानं केला. त्यानंतर तिसऱ्याच सामन्यात अनेक मोठे विक्रम त्यानं मोडत क्रिकेट विश्वाला स्वत:ची दखल घ्यायला त्यानं भाग पाडलं.