IPL 2025 Bihar CM announces Rs 10 lakh for Vaibhav Suryavanshi: वैभवी सूर्यवंशी… हे नाव सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. आयपीएल २०२४ मध्येे राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने वादळी शतक झळकावत सर्वांनाच चकित केलं. १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करत आपल्या तिसऱ्याच डावात त्याने शतकी खेळी करत कमी वयातच आपल्या कामगिरीची छाप पाडली. दरम्यान त्याला बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी या विक्रमी खेळीसाठी लाखोंची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.

वैभवच्या या वादळी शतकानंतर आजी माजी खेळाडू, सेलिब्रेटी, क्रिकेटचा चाहता वर्ग सर्वच त्याच कौतुक करत आहेत. मूळचा बिहारचा असलेल्या वैभव सूर्यवंशीची कामगिरी देशभरात चर्चेत आहे आणि सर्वच जण त्याचं कौतुक करत आहेत. वैभव सूर्यवंशीने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावलं नाही तर त्याने विक्रमही आपल्या नावे केला. वैभव आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा भारतीय खेळाडूही ठरला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याची माहिती मिळताच त्यांनी कॉलवर त्याच्याशी संपर्क साधला.

शतकानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैभव सूर्यवंशी याच्याशी संवाद साधला आणि त्याच्या अतुलनीय खेळीबद्दल त्याचे अभिनंदन केले. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्याला १० लाख रुपये बक्षीसाची रक्कम देण्याची घोषणाही केली. नितीश कुमार यांनी पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे आणि त्याचं कौतुकही केलं.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पोस्ट करत लिहिले, आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतकी कामगिरी करणाऱ्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीला खूप खूप शुभेच्छा. तो आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाचं भविष्य ठरत आहे. सर्वांनाच तुझा खूप अभिमान आहे. २०२४ मध्ये वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या वडिलांची भेट झाली होती, जिथे मी त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

पुढे नितीश कुमार म्हणाले, आयपीएलमधील त्याच्या दमदार कामगिरीनंतर त्याला कॉल करून शुभेच्छाही दिल्या. बिहारचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून १० लाख रूपयांचे मानधन देण्यात येईल. मला आशा आहे की वैभव भविष्यात भारतीय संघासाठी नवे विक्रम रचेल आणि देशाला गौरव मिळवून देईल.

वैभव सूर्यवंशीच्या ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने केलेल्या १०१ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने १५.५ षटकांत गुजरात टायटन्सवर ८ विकेट्सने विजय मिळवला. वैभवने पहिल्यांदा १७ चेंडूत आपले सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. नंतर गियर बदलत अवघ्या ३५ चेंडूत शतक पूर्ण करत आपल्या कामगिरीची छाप पाडत संघाच्या विजयाचा हिरो ठरला.