Vaibhav Suryavanshi breaks world record with 35-ball hundred: भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये ऐतिहासिक खेळी केली आहे. फक्त आयपीएलचं नव्हे तर त्याने टी-२० क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक खेळी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावून त्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत आपलं शतक झळकावत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वैभव सूर्यवंशीच्या या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर १५.५ षटकांत २१२ धावा करत विजय मिळवला.

वैभव सूर्यवंशीने आयपीएलमधील त्याच्या तिसऱ्याच डावात शतक पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. वैभव सूर्यवंशी हा अवघ्या १४ वर्षांचा आहे. वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक कमालीच्या गोलंदाजांची शाळा घेत त्यांच्याविरूद्ध वादळी फटकेबाजी केली. वैभवने इशांत शर्मासारख्या भेदक गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या षटकात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत २६ धावा केल्या. यासह वैभवने १७ चेंडूत आपले विक्रमी अर्धशतक पूर्ण केले. जे यंदाच्या आयपीएलमधील जलद अर्धशतक आहे.

वैभव सूर्यवंशीने षटकारांचा चौकारांची आतिषबाजी करत गुजरात टायटन्सचा आयपीएल पदार्पणवीर करीम जनतच्या षटकात तब्बल ३० धावा कुटल्या. संथ सुरूवात केल्यानंतर वैभव सूर्यवंशीने गियर बदलत ३५ चेंडूत शतक पूर्ण करत सर्वांनाच धक्का दिला. वैभवने ३८ चेंडूत ७ चौकार आणि तब्बल ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. वैभवच्या या शतकानंतर खुद्द राहुल द्रविड यांनी दुखापत असताना उभं राहून टाळ्या वाजवत कौतुक केलं. तर काही खेळाडू खुर्चीवर उभं राहून त्याला शाबासकी देत होते.

वैभवने या शतकासह अनोखा विश्व विक्रमही आपल्या नावे केला आहे. वैभव सूर्यवंशी टी-२० क्रिकेटच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही बनला. त्याचं सध्याचं वय १४ वर्षे ३२ दिवस आहे. वैभवनंतर या यादीत सर्व फलंदाज हे १८ वर्षाचे आहेत, ज्यांनी शतकी खेळी केली आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, देवदत्त पडिक्कल आणि मनिष पांडे यांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये वैभवने दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं आहे. त्याच्याआधी ख्रिस गेल आहे ज्याने आयपीएलमध्ये ३० चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. वैभवच्या या खेळीचं संपूर्ण क्रिकेट जगतात कौतुक होत आहे. रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांनी पोस्ट करत त्याचं कौतुक केलं.