IPL 2025: क्रिकेट जगतात फार कमी खेळाडू आहेत, जे क्रिकेटबरोबरच अभ्यासातही अव्वल आहेत. आयपीएलमध्ये केकेआरने २३.७५ कोटी खर्चून संघात घेतलेला व्यंकटेश अय्यर येत्या काळात डॉक्टरकीची पदवी मिळवणार आहे. व्यंकटेशने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटबरोबर अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे, हेही सांगितले. तो ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांशी अभ्यासाबद्दल चर्चा करत असतो असंही त्याने चर्चा करताना सांगितलं.
व्यंकटेश अय्यरच्या म्हणण्यानुसार, तो अभ्यासात चांगला आहे आणि खेळाबरोबरच अभ्यासावरही पूर्ण लक्ष देतो. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याने सांगितले की, ‘मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मी फक्त क्रिकेट खेळेन हे घरच्यांना पटवणं सोपं नव्हतं. अभ्यासात मी चांगली प्रगती करत होतो, पण माझ्या आईवडिलांना मी क्रिकेटमध्ये ही चांगली कामगिरी करावी अशी इच्छा होती.
हेही वाचा – ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
अय्यरने सांगितले की, जेव्हाही मध्य प्रदेशातील (अय्यरचा देशांतर्गत क्रिकेटमधील संघ) ड्रेसिंग रूममध्ये नवीन खेळाडू येतो तेव्हा तो त्याला विचारतो, ‘तू क्रिकेटबरोबर पुढे शिक्षणही पूर्ण करतो आहेस की नाही?’ अय्यर म्हणाला, ‘शिक्षण पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे. वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत आपण खेळू शकत नाही. आपल्याला हे समजले पाहिजे की क्रिकेट हे फक्त थोड्या काळासाठी आहे. त्यानंतर आयुष्यात काही करायचे असेल तर शिक्षण आवश्यक आहे. अभ्यास करण्यासाठी मी क्रिकेटमधून थोडा वेळ काढतो. मला सतत खेळाचा विचार करायचा नाही. यामुळे दबाव वाढतो.
केकेआरच्या या खेळाडूने पुढे सांगितले की तो सध्या पीएचडी करत आहे. अय्यर म्हणाला, ‘जर मी एकाच वेळी दोन गोष्टी करू शकत असेन तर ते करण्याला मी प्राधान्य देतो. अभ्यासामुळे मला मैदानावर चांगले निर्णय घेण्यासही मदत होते. क्रिकेटपटूंना केवळ क्रिकेटचे ज्ञानच नाही तर सामान्य ज्ञानही असावे, असे मला वाटतं. जर तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकत असाल तर तुम्ही ते नक्कीच केले पाहिजे. मी सध्या पीएचडी (फायनान्स) करत आहे. पुढच्या वेळी तुम्ही माझी डॉ. व्यंकटेश अय्यर म्हणून मुलाखत घ्याल!’