MI vs LSG Neeta Ambani Chats With Rohit Sharma: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स (MI) साठी यंदाचे आयपीएल अधिकृतरित्या संपले. मुंबईचा शेवटचा सामना तरी गोड व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती पण लखनौच्या धडाकेबाज खेळीमुळे या इच्छेचा सुद्धा काल शेवट झाला. या दरम्यान सामन्यातील अनेक गोष्टी काल चर्चेत आल्या. जसं की सचिन तेंडुलकरच्या मुलाची म्हणजेच अर्जुनची गोलंदाजी,आक्रमकपणा, के एल राहुलच्या खेळीवर एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांची प्रतिक्रिया, निकोलस पुरनचे भलेमोठे षटकार. पण यात सर्वात लक्षवेधी ठरलेली बाब म्हणजे रोहित शर्माने टाळ्यांच्या कडकडाटात वानखेडेतील प्रेक्षकांना केलेला रामराम. रोहितने ज्या पद्धतीने काल वानखेडेच्या मैदानातून पॅव्हेलियनमध्ये जाताना प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यावरून निश्चितच पुढील वर्षी रोहित मुंबई इंडियन्सचा भाग नसेल अशा चर्चा होत आहेत. यात भर पाडण्यासाठी आता नीता अंबानी व रोहित शर्मा यांच्यातील संवादाचा सुद्धा एक व्हिडीओ समोर आला आहे.
नीता अंबानी आणि रोहित शर्मा यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल होताच लोकांनी लगेच वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. काहीच दिवसांपूर्वी लखनौ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार के एल राहुल याच्याशी पराभवानंतर मैदानात असाच वाद घातला होता,नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून कदाचित आता मुंबई इंडियन्सच्या मालकीण बाई म्हणजेच नीता अंबानी सुद्धा रोहितला सुनावतायत का असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींनी याउलट थेअरी मांडून रोहित शर्माला थांबवण्यासाठी नीता अंबानी प्रयत्न करत आहेत असाही अंदाज वर्तवला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
“नीता अंबानी रोहित शर्माला मुंबई इंडियन्स न सोडण्याची विनंती करत आहेत का?”
“अरे यार इथे कुणाला लीप रिडींग येत असेल तर त्यांना बोलवून आणा.”
“नीता अंबानी नक्कीच त्याला मुंबई इंडियन्समध्ये थांबायला सांगतायत.”
“हे दोघे हार्दिक पांड्याबद्दल बोलत असणार.”
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्सच्या सामन्याच्या निकालाबाबत सांगायचं तर, वानखेडेवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सन प्रथम खेळून २० षटकात २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १९६ धावा करू शकला. मुंबईचा हा दहावा पराभव असून लखनऊचा हा सातवा विजय आहे. मुंबईकडून नमन धीरने २८ चेंडूत ६२ तर रोहित शर्माने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या. मात्र, विजयासाठी हे पुरेसे नव्हते. अखेरीस मुंबईच्या पहिल्या मॅचप्रमाणे शेवटचा सामना सुद्धा देवाला वाहून मुंबईचा चमू वानखेडेच्या ड्रेसिंग रूममध्ये परतला.
हे ही वाचा<< २ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
दरम्यान, मॅच नंतर काही तासांनी शेअर केल्यापासून, नीता अंबानी व रोहित शर्मा यांच्या या व्हिडीओवर ४६ हजाराहून अधिक व्ह्यूज, १७०० हुन अधिक लाईक्स व भन्नाट कमेंट्स आल्या आहेत.
तुम्हाला काय वाटतं नक्की नीता अंबानी या व्हिडीओमध्ये काय म्हणत असतील?