Sanju Samson to Liam Livingstone run out video viral : शनिवारी आयपीएल २०२४ मधील २७ वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी मात करत यंदाच्या हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने धोनीच्या शैलीत लियाम लिव्हिंगस्टोनला धावबाद केल्याचे दिसत आहे. ज्यामुळे चाहते संजू सॅमसनचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई –

संजू सॅमसनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वास्तविक, ही घटना पंजाब किंग्जच्या डावाच्या १८ व्या षटकात घडली. पंजाब किंग्जच्या डावाच्या १८व्या षटकात राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) फलंदाज आशुतोष शर्माने या षटकातील पाचवा चेंडू मिड-विकेटच्या दिशेला खेळला. यानंतर एक धाव चोरल्यानंतर आशुतोष शर्माने लगेच लियाम लिव्हिंगस्टोनला दुसरी धाव घेण्यास नकार दिला, कारण राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षक तनुष कोटियन चेंडूच्या अगदी जवळ होता.

संजूच्या चतुराईने चाहते चकित –

मात्र, इंग्लंडचा हा क्रिकेटपटू दुसऱ्या धावेसाठी धावला. अर्ध्या खेळपट्टीपर्यंत धाव घेतल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने मागे वळून क्रीज गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षक तनुष कोटियनने यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने जोरदार थ्रो केला. लियाम लिव्हिंगस्टोन जवळजवळ क्रीजवर पोहोचला होता तेव्हा अचानक संजू सॅमसनने तनुष कोटियनचा थ्रो स्टंपच्या दिशेने वळवला. संजू सॅमसनने धोनीच्या शैलीत स्टंपवर चेंडू वेगाने मारत लियाम लिव्हिंगस्टोनला धावबाद केले. ज्यामुळे लियाम लिव्हिंगस्टोन २१ धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमनसचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – PBKS vs RR : रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा पंजाबवर ३ विकेट्सनी निसटता विजय, शिमरॉन हेटमायरची निर्णायक खेळी

राजस्थान रॉयल्सने पाचवा सामना जिंकला –

सामन्याबद्दल बोलायचे तर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना खूपच रोमहर्षक झाला. ज्यामध्ये शिमरॉन हेटमायरच्या १० चेंडूत २७ धावांच्या नाबाद खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा एक चेंडू आणि ३ राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या १४ चेंडूंमध्ये ३० धावांची गरज होती, त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल (पाच चेंडूत ११ धावा) या वेस्ट इंडिजच्या फलंदाज जोडीने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानला सहा सामन्यांतील पाचवा विजय मिळवून दिला. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ शिमरॉन हेटमायरने आपल्या नाबाद खेळीत एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. पंजाबला ८ बाद १४७ धावांवर रोखल्यानंतर राजस्थानने १९.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावा करून गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. हेटमायरशिवाय यशस्वी जैस्वालनेही राजस्थानसाठी ३९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of rajasthan royals sanju samson cleverly run out punjab kings liam livingstone goes viral in ipl 2024 vbm