Shimron Hetmyer welcome video: रविवारी (१६ एप्रिल) रात्री आयपीएल २०२३ मधील २३ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देणारा शिमरॉन हेटमायर सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. त्याच्या खेळीबद्दल क्रिकेट चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत, तसेच राजस्थान फ्रँचायझी देखील या खेळाडूचे बॅक टू बॅक व्हिडिओ पोस्ट करत आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थानला सामना जिंकतानाचे आणि नंतर सहकारी खेळाडूंसोबत मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ यामध्ये आहेत.
दरम्यान एका व्हिडिओमध्ये आर अश्विन आणि संजू सॅमसन देखील शिमरॉनच्या मॅच-विनिंग खेळीचा आनंद घेताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये आर अश्विन त्याच्या टीमचा कर्णधार संजू सॅमसनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. यादरम्यान तो मोठ्याने ओरडून शिमरॉन हेटमायरला सेल्फीसाठी बोलावतो. इथे शिमरॉन ग्रुपमध्ये सामील होतो आणि मग धमाल सुरू होते. शिमरॉनही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाच्या स्टाइलमध्ये शाहरुखप्रमाणे ‘सिमरन’ बोलताना दिसत आहे. इथेही हशा पिकला. राजस्थान रॉयल्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
राजस्थान रॉयल्सने मॅच-विनिंग इनिंग खेळल्यानंतर शिमरॉन स्टेडियममधून ड्रेसिंग रुममध्ये येतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये, गुजरातविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण सार दिसत आहे. पहिल्या चार विकेट झटपट गमावल्यानंतर राजस्थानच्या मधल्या आणि खालच्या फळीने वेगवान फलंदाजी करत राजस्थानला कसा विजय मिळवून दिला, हे दाखवण्यात आले आहे.
अशक्य वाटणारा विजय राजस्थानने शक्य करून दाखवला –
या सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सकडून १७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. एकवेळ राजस्थान संघाने १०.३ षटकांत ५५ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. येथून संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरने राजस्थानला विजय मिळवून दिला. संजू सॅमसन ३२ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. हेटमायरने २६ चेंडूत ५६ धावांची नाबाद खेळी खेळली.
देवदत्त पडिक्कलने २५ चेंडूत २६ धावा केल्या. ध्रुव जुरेलने १० चेंडूत १८ आणि रविचंद्रन अश्विनने तीन चेंडूत १० धावा करत राजस्थानला विजयाच्या जवळ नेले. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात ३६ धावा करायच्या होत्या. हेटमायर, जुरेल आणि अश्विन यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला.