Dhruv Jurel copying Sanju Samson’s Shots: आयपीएल २०२३ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमधील सामना होणार आहे. या रोमांचक सामन्यापूर्वी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. या व्यायामादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे संजू ज्या नेटवर सराव करतो, त्या नेटच्या मागे राजस्थानचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल त्याच्या शॉट्सची कॉपी करताना सावलीप्रमाणे सराव करत आहे.
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याच वेळी, संजूच्या नेटच्या मागे राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज ध्रुव जुरेल आहे. जो आपल्या कर्णधाराच्या शॉट्सची हुबेहूब कॉपी करताना दिसतो. ध्रुवच्या या सावलीप्रमाणे सरावाचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. ध्रुवच्या या सावली सरावाचे चाहते कौतुक करत आहेत. काही चाहते तर ध्रुवला राजस्थानचा दुसरा सॅमसन म्हणत आहेत.
विशेष म्हणजे राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. काही सामन्यांमध्ये त्याने हे सिद्धही केले आहे. जुरेलने या मोसमात राजस्थानसाठी १० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८३.११ च्या स्फोटक स्ट्राइक रेटने १४१ धावा केल्या आहेत. या मोसमात ध्रुवने ११ चौकार आणि ८ षटकार मारले आहेत. तो राजस्थानसाठी एका चांगल्या फिनिशरची भूमिका साकारताना दिसला आहे. आजच्या सामन्यात विजयाची नोंद करून राजस्थानचा संघ प्लेऑफमधील आपला मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा – CSK Team: महेंद्रसिंग धोनीचा सीएसकेबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “मी संघाला सांगितले आहे की, मला जास्त…”
केकेआर आणि आरआर मधील हेड टू हेड आकडेवारी –
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, केकेआर आणि आरआर यांच्यात २७ सामने झाले आहेत, त्यापैकी केकेआरने १४ आणि राजस्थानने १२ विजय मिळवले आहेत. पावसामुळे एक सामना होऊ शकला नाही. केकेआर आणि आरआर यांचे सध्या समान दहा गुण आहेत, म्हणजेच आजचा विजय त्यांचे गुण १२ वर घेऊन जाईल. मुंबई इंडियन्सकडे १२ गुण आधीच आहेत, परंतु मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळे जो संघ १२ गुण घेतो तो थेट तिसऱ्या क्रमांकावर जाईल आणि एमआयला चौथ्या क्रमांकावर सरकावे लागेल. आज विजय मिळवणारा संघ प्लेऑफमधील आपल्या आशा जिवंत ठेवेल, तर पराभूत होणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.