RCB Player Visits Mohammad Siraj’s House: आयपीएलच्या १६ हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत १२ लीग सामने खेळले आहेत. संघ आपला पुढचा सामना १८ मे, गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे खेळणार. या सामन्यापूर्वी विराट कोहलीसह अनेक आरसीबी खेळाडू मोहम्मद सिराजच्या नवीन घरी पोहोचले. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसपासून ते संघाचा नवा खेळाडू केदार जाधवपर्यंत या खेळाडूंमध्ये दिसले.
कर्णधार फाफ डुप्लेसिससोबत वेगवान गोलंदाज वेन पारनेलही दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आरसीबीचे खेळाडू मोहम्मद सिराजच्या नवीन घरी पोहोचल्याचे दिसत आहे. आरसीबी संघ त्याच्या पुढील सामन्यासाठी हैदराबादमध्ये आहे. यामुळे जवळपास संपूर्ण टीम मोहम्मद सिराजच्या घरी पोहोचली. यावेळी विराट कोहली काळ्या शर्टमध्ये दिसला.
आरसीबीने शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला –
आरसीबीने त्यांचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला, ज्यामध्ये संघाने ११२ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला राजस्थानचा संघ अवघ्या १०.३ षटकांत केवळ ५९ धावांत गारद झाला.
आरसीबी गुणतालिकेत पाचव्या स्थानी –
राजस्थानविरुद्ध मोठा विजय नोंदवल्यानंतर आरसीबी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले असून, ६ जिंकले आहेत आणि ६ गमावले आहेत. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी संघाला दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. दोन्ही सामने जिंकल्यानंतरही आरसीबीला लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जसारख्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. आता आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
विराट कोहलीने रचला विक्रम –
विराट कोहलीने बॅटने काही कमाल केली नाही. पण राजस्थानविरुद्ध क्षेत्ररक्षणात उतरल्यावर त्याने एक मोठा विक्रम केला. विराटने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात राजस्थानचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालचा झेल घेत किरॉन पोलार्डला मागे टाकले. आता तो नॉन-विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, आयपीएलमध्ये केवळ ३ विकेटकीपर नसलेले असे खेळाडू आहेत, ज्यांनी १०० हून अधिक झेल घेतले आहेत.