आरसीबीने राजस्थान रॉयल्सविरूद्ध सहज विजय मिळवत आयपीएल २०२५ मधील तिसरा विजय नोंदवला. विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या ९० अधिक धावांच्या भागीदारीसह संघाने विजयाचा पाया रचला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार ६२ धावा केल्या तर त्याचा सलामीचा जोडीदार फिल साल्टनेही अर्धशतक (६५) झळकावले. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि संजू सॅमसन यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
१६ व्या षटकात, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल क्रीजवर फलंदाजी करत होते. चेंडू तुषार देशपांडेच्या हातात होता. देशपांडेने चौथा चेंडू टाकला तेव्हा देवदत्त पडिक्कलने दोन धावा घेतल्या. धाव घेताना विराट कोहली धावता धावता अचानक थांबला. अचानक त्याला थोडं घाबरल्यासारखं वाटलं आणि तो बेचैन दिसला. यानंतर पंच आणि राजस्थानचे खेळाडू त्याच्याकडे आले. संजू सॅमसनने तर त्याच्या हृदयाचे ठोके तपासायला सुरुवात केली. विराटने स्वतः त्याला हार्ट रेट चेक कर सांगितलं.
राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद १७३ धावा केल्या. जैस्वालने ४७ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह ७५ धावा केल्या. त्याने रियान परागबरोबर (३०)दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.
१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या संघाने आरसीबीला केवळ १७.३ षटकांत विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सकडून फक्त कुमार कार्तिकेयने १ विकेट घेतली. राजस्थानची फिल्डिंगही त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. सामन्याच्या पहिल्याच षटकात रियान परागने विराट कोहलीचा झेल सोडला. विराट कोहलीने या जीवनदानानंतर संघाला विजय मिळवून दिला.