Lucknow Super Kings vs Royal Challengers Bangalore, IPL Today Match Updates:आरसबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आयपीएल २०२३ च्या १५ व्या सामन्यात एलएसजीविरुद्ध अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक संघांविरुद्ध ५० हून अधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने आता आयपीएलमध्ये एकूण १३ संघांविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत.
या बाबतीत त्याने डेव्हिड वॉर्नर, गौतम गंभीर आणि शिखर धवनसारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे. कोहलीने आयपीएल २०२३ च्या सध्याच्या ९ संघांविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एलएसजीविरुद्धचे हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. यासह, आयपीएलमध्ये १३ संघांविरुद्ध अर्धशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीत वॉर्नर, गंभीर आणि धवन १२-१२ संघांविरुद्ध अर्धशतके झळकावून त्याच्या मागे आहेत.
हेही वाचा – RCB vs LSG: लखनऊविरुद्ध एक धाव घेताच फाफ डू प्लेसिसने नोंदवला मोठा विक्रम; आयपीएलमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांविरुद्ध अर्धशतक झळकावणारे खेळाडू –
विराट कोहली – १३
डेव्हिड वॉर्नर – १२
गौतम गंभीर – १२
शिखर धवन – १२
१२व्या षटकात अमित मिश्राने विराट कोहलीचा डाव संपुष्टात आणला. विराटने ४४ चेंडूंत चार चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पॉवरप्लेमध्ये टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्याही केली. विराट कोहलीने लखनऊविरुद्ध पहिल्या ६ षटकात ४२ धावा जोडल्या. कोणत्याही टी-२० सामन्यातील पॉवरप्लेमधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.
हेही वाचा – IPL 2023: पाच षटकारानंतर यश दयालला अश्रू अनावर; वडिलांनी ‘या’ खेळांडूचे उदाहरण देत सावरण्याचा दिला सल्ला
पॉवरप्ले ओव्हर्समध्ये विराट कोहलीने केलेल्या सर्वाधिक धावा –
४२ विरुद्ध एलएसजी, २०२३
३९ विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१७
३८ विरुद्ध श्रीलंका, २०१२
३७ विरुद्ध इंग्लंड, २०१२-१३
३६ विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स, २०१८
३६ विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०१८
आरसीबीचे एलएसजीला २१३ धावांचे लक्ष्य –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य दिले. कर्णधार फाफ डु प्लेसिसने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ४६ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या. मॅक्सवेलने ५९ आणि कोहलीने ६१ धावा केल्या. लखनऊकडून अमित मिश्रा आणि मार्क वुडने १-१ बळी घेतला.