IPL 2025 MI vs RCB Virat Kohli Record: आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळवला जात आहे. वानखेडेच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. दरम्यान सलामीला आलेल्या विराट कोहलीने दणक्यात सुरूवात करत अवघ्या २९ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण नंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली झेलबाद झाला. पण दरम्यान विराट कोहलीने टी-२० मधील अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
विराट कोहलीने मुंबईविरूद्ध सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत टी-२० क्रिकेटमध्ये एक असा विक्रम केला आहे. जो आजवर कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलेला नाही. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात फक्त ५ असे फलंदाज आहेत ज्यांनी आजवर हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना विराट कोहलीने क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण केल्या. ३६ वर्षीय कोहलीने आपल्या डावात १७ धावा करत ही कामगिरी केली. कोहली T20 मध्ये १३ हजार धावा करणारा पहिला भारतीय आणि हा पराक्रम करणारा जगातील फक्त पाचवा फलंदाज आहे. तर सर्वात जलद १३ हजार धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज आहे.
कोहलीने आपल्या ३८६ व्या टी-२० डावात ही कामगिरी केली. यासह, वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलनंतर सर्वात कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी करणारा तो फलंदाज ठरला. गेलने केवळ ३१८१ डावात १३ हजार धावा केल्या होत्या. इंग्लिश फलंदाज ॲलेक्स हेल्सला जवळपास ९० डावांनी मागे टाकत कोहलीने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ हजार धावा पूर्ण करणारे फलंदाज
ख्रिस गेल – ३८९ सामन्यांमध्ये ३८१ डाव (बार्बाडोस ट्रायडेंट्स विरुद्ध – सप्टेंबर २०१९)
विराट कोहली – ४०३ सामन्यांमध्ये ३८६ डाव – (मुंबई इंडियन्स विरुद्ध – एप्रिल २०२५)
अॅलेक्स हेल्स – ४७८ सामन्यांमध्ये ४७४ डाव (फॉर्च्यून बरीशाल विरुद्ध – जानेवारी २०२५)
शोएब मलिक – ५२६ सामन्यांमध्ये ४८७ डाव (रंगपूर रायडर्स विरुद्ध – जानेवारी २०२४)
कायरन पोलार्ड – ६६८ सामन्यांमध्ये ५९४ डाव (नॉर्दर्न सुपरचार्जर्स विरुद्ध – जुलै २०२४)
शतकांच्या बाबतीतही कोहली भारतीय फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ९ शतकं झळकावली आहेत. यातील आठ आयपीएलमधील शतकं आहेत. कोहलीने याआधी २०२१ च्या आयपीएलमध्ये १० हजार टी-२० धावांचा टप्पा पार केला होता. बाबर आझम आणि ख्रिस गेलनंतर विराट हा तिसरा वेगवान फलंदाज होता. त्याने २९९ डावात ही कामगिरी केली. कोहलीच्या आयपीएलमध्ये ८ हजारहून अधिक धावा आहेत. तो लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.