Virat Kohli Creates History with Most Runs In IPL Win: चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात यजमान आरसीबी संघाने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीची या सामन्यात शानदार खेळी पाहायला मिळाली. त्याचवेळी त्याने आयपीएलमध्ये असा पराक्रमही केला जो याआधी कोणीही करू शकले नव्हते.
विराट कोहलीने या सामन्यात २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारासंह ४२ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. यासह विराट कोहलीने आयपीएलमधील विजयी सामन्यांमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे विजयी सामन्यांमध्ये ४००० धावा करणारा विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी कोणताही खेळाडू ही कामगिरी करू शकला नाही.
आयपीएलमध्ये संघाच्या विजयी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा
४०३९ धावा – विराट कोहली*
३९४५ धावा – शिखर धवन
३९१८ धावा – रोहित शर्मा<br>३७१० धावा – डेव्हिड वॉर्नर<br>३५५९ धावा – सुरेश रैना
टी-२० वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीची शानदार कामगिरी
विराट कोहलीने या डावात आपल्या टी-२० कारकिर्दीत १२,५०० धावांचा आकडाही गाठला. T20 क्रिकेटमध्ये १२,५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी या यादीत ख्रिस गेल, शोएब मलिक आणि कायरन पोलार्ड यांनाच ही कामगिरी करता आली होती. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही विराट चौथ्या स्थानावर आहे. विराटच्या नावे आता टी-२० क्रिकेटमध्ये १२,५३६ धावा केल्या आहेत.
टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१४,५६२ धावा – ख्रिस गेल
१३,३६० धावा – शोएब मलिक
१२,९०० धावा – किरॉन पोलार्ड.
१२,५३६ धावा – विराट कोहली*