Virat Kohli Emotional Tweet Viral : गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पुन्हा एकदा आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. आयपीएलचा किताब जिंकण्याचं विराट कोहलीचं स्वप्न पुन्हा एकदा तुटलं. आयपीएलच्या प्ले ऑफमधून बाहेर पडल्यानंतर कोहलीनं ट्वीटरवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून कोहलीनं आरसीबीच्या प्रदर्शनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय कोहलीनं चाहत्यांचेही आभार मानले आहेत. कोहलीचा हा ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीने ट्वीट करत म्हटलं की, “एका हंगामात असे क्षण होते, जे खूप अविस्मरणीय आहेत. दुर्देवाने आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकलो नाही. आम्ही निराश आहोत पण पुढील सीजनसाठी मोठ्या आत्मविश्वासाने तयारी केली पाहिजे. आम्हाला प्रत्येक वेळी समर्थन करणाऱ्या चाहत्यांचा मी आभारी आहे. प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद. पुढील सीजनमध्ये अधिक मजबूत होऊन वापसी करण्याचं आमचं ध्येय आहे.”
या आयपीएल सीजनमध्ये विराट कोहलीने चमकदार कामगिरी करून धावांचा पाऊस पाडला आहे. कोहलीने १४ सामन्यांत अप्रतिम फलंदाजी करून ६३९ धावा कुटल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये कोहली सर्वात जास्त शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यात किंग कोहलीने शतकी खेळी केली होती. परंतु, गुजरातचा स्टार फलंदाज शुबमन गिलनेही शतक ठोकून सामन्यात विजयी पताका फडकवली. कोहलीसाठी हा सीजन शानदार राहिला आहे. २०१६ मध्येही कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करून ९७३ धावा कुटल्या होत्या.