Virat Kohli Confession RCB vs SRH: आपल्या संघाला प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकवून ठेवत विराट कोहलीने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सर्वात मोठी कामगिरी केली. सनराइजर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करताना कोहलीने ६३ चेंडूत १०० धावा केल्या आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस ७१ धावा पूर्ण करत १७२ ची भागीदारी केली. कोहली व फाफ डू प्लेसिसच्या चमकदार कामगिरीने बंगळुरूने सहज विजय खेचून आणला. यानंतर विराट कोहलीवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. या परफॉर्मन्सनंतर विराट कोहलीने आपल्या मनातील काही भाव बोलून दाखवले आहेत.
विराट सांगतो, “मला पर्वा नाही कारण…”
विराट कोहली सांगतो की, “मी कधीच भूतकाळातील आकड्यांकडे पाहत नाही. मी आधीच खूप तणावाखाली आहे. इम्पॅक्ट नॉक्स खेळूनही मी स्वतःला कधी-कधी पुरेसे श्रेय देत नाही. (म्हणून) बाहेरून कोणी काय म्हणेल याची मला पर्वा नाही. कारण ते त्यांचे मत आहे. कोहलीला SRH विरुद्धच्या त्याच्या रेकॉर्डबद्दल विचारले असता, “जेव्हा तुम्ही स्वतः अशा परिस्थितीत असता, तेव्हा तुम्हाला कसे जिंकायचे हे माहित असते . मी हे आधीपासून केले आहे, जेव्हा मी खेळतो तेव्हा मी माझ्या संघासाठी खेळतो जिंकल्यावर मलाही अभिमान वाटतो. मी आताही परिस्थितीनुसार खेळत आहे.”
विराट कोहलीचा वेग मधल्या षटकात एवढा संथ का?
दरम्यान, मधल्या षटकांमध्ये गती कमी झाल्याबद्दल अनेकदा टीका करणाऱ्यांना कोहलीने सांगितले की, “मला माझ्या तंत्रावर विश्वास आहे मला फॅन्सी शॉट्स खेळणे टाळायचे आहे. मी इतके फॅन्सी शॉट्स खेळणारा माणूस कधीच नव्हतो. आम्हाला वर्षाचे १२ महिने खेळावे लागते. माझ्यासाठी फक्त फॅन्सी शॉट्स खेळणे आणि माझी विकेट गमावणे हे ध्येय नाही. आयपीएल नंतर कसोटी क्रिकेट सुरु होईल आहे. मला माझ्या तंत्राशी प्रामाणिक राहावे लागेल आणि माझ्या संघासाठी गेम जिंकण्याचे मार्ग शोधावे लागतील.”
फाफ डु प्लेसिस आणि विराटचं ‘सिक्रेट’
फाफ डु प्लेसिससह जोडीने इतकी चांगली कामगिरी केल्याचे रहस्य काय आहे, असे विचारल्यावर कोहलीने मस्करीत म्हटले की “मला वाटते आमचे टॅटू याला कारण आहे. जसे एबी आणि मी एकत्र फलंदाजी करतो तसाच ताळमेळ फाफच्या बाबत पण आहे. आपण कुठे आहोत आणि खेळ कसा पुढे न्यायचा याची त्याला चांगली जाणीव आहे.”
हे ही वाचा<< विराट कोहलीच्या विक्रमी शतकावर सचिन तेंडुलकरची पोस्ट चर्चेत, “मोठे शॉट्स खेळले पण जेव्हा…”
दुसरीकडे आयपीएलची आकडेवारी व पॉईंट टेबलची स्थिती पाहता, कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यातील १७२ धावांच्या भागीदारीमुळे आरसीबीने ८ गडी राखून सामना जिंकला तसेच पॉइंट टेबलवर पुन्हा पहिल्या चारमध्ये झेप घेतली आहे. सध्या आरसीबीसह गुजरात, चेन्नई व लखनऊ हे आघाडीवर आहेत.