IPL 2025 RR vs RCB Match Highlights in Marathi: आरसीबीने राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर शानदार कामगिरीसह ९ विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने यंदाच्या मोसमात इतर संघांच्या घरच्या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही. यासह आरसीबीचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली आणि फिल सॉल्टने १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली आणि ९२ धावांची भागीदारी रचली. यानंतर सॉल्टची विकेट गेल्यानंतर विराटने जे काही केलं त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
फिल सॉल्ट उत्कृष्ट फॉर्मात असून तो सलामीला उतरताच मोठमोठे फटके खेळत पॉवरप्लेमध्ये संघाला चांगली सुरूवात करून देतो. विराट कोहली आणि फिल सॉल्टच्या जोडीने आरसीबीला यंदाच्या मोसमात चांगल्या धावसंख्येचा पाया रचून दिला आहे. राजस्थानविरूद्ध झालेल्या सामन्यातही या दोघांनी हिच कामगिरी केली.
फिल सॉल्टने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली अन् झेलबाद झाला. राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीने या सामन्यात खराब फिल्डिंग केल्याचा दोन्ही संघांना फटका बसला. तर राजस्थानला दुसऱ्या डावात फक्त एकच विकेट मिळवता आली.
संजू सॅमसनने नववे षटक टाकण्याची जबाबदारी कुमार कार्तिकेय या युवा फिरकीपटूला दिली. कार्तिकेयच्या षटकात सॉल्टने तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला. पण कार्तिकेयने हार मानली नाही. कार्तिकेयच्या पुढच्या चेंडूवर फिल सॉल्ट पूल शॉट मारायला गेला आणि झेलबाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या कार्तिकेयने संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
सॉल्ट झेलबाद होताच नॉन स्ट्राईकर एंडला उभ्या असलेल्या विराट कोहलीने कुमार कार्तिकेयला हात मिळवला. विराटने कार्तिकेयला हात मिळवत त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. विराटची ही कृती पाहून सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तर यानंतर विराटने सॉल्टला ही शाबासकी दिली.
फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने संघाच्या विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तर देवदत्त पड्डिकलनेही त्याला चांगली साथ दिली. विराट कोहली ४५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावा करत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. तर देवदत्त पड्डिकल २८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४० धावा करत नाबाद परतला.