Virat Kohli Embraces Shubman Gill Video Viral : आयपीएल २०२३ चा ७० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आरसीबीने फलंदाजी करत गुजरातच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. आरसीबीचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला माजी कर्णधार विराट कोहलीनं पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी करून यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसरं शतक झळकावलं. या शतकाच्या जोरावर आरसीबीने १९७ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा सलामीचा स्टार फलंदाज शुबमन गिलनेही मैदानात चौफेर फटकेबाजी करत जशाच तसे उत्तर दिले.
विराटनंतर शुबमनने यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसरं शतक ठोकलं. शुबमनने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीनं १०४ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे गुजरातने १९८ धावा करून आरसीबीचा पराभव केला. परंतु, सामना संपल्यानंतर एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं शुबमनला मैदानात मिठी मारली. विराट शुबमनच्या फलंदाजीचे नेहमीच कौतुक करत असतो. यावेळी त्याने शुबमनला अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. या दिग्गज खेळाडूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हि़डीओला नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
नक्की वाचा – RCB vs GT Match: गुजरातच्या RCB वरील विजयानं मुंबई प्ले ऑफमध्ये दाखल
इथे पाहा व्हिडीओ
शुबमन गिल विराट कोहलीकडे त्याच्या आयडॉल म्हणून पाहतो. या दोघांमध्ये जबरदस्त मैत्री आहे. मैदानाच्या बाहेर असल्यावर हे दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना किंवा इतर खेळाडूंचं मनोरंजन करताना दिसतात. दोघांमध्ये असलेली घट्ट मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. दरम्यान, या सामन्यात आरसीबीसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिसने १९ चेंडूत २८ धावा केल्या. नूर अहमदच्या फिरकीवर फाफ बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. विराटने पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी केली अन् गुजरातविरोधातही शतकी खेळी करत इतिहास रचला. विराट ६१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. ग्लेन मॅक्सवेल ११ धावांवर असताना राशिद खानच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.