RCB In IPL 2024 Playoffs: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला अपयशाचा स्पीडब्रेकर पार केला. आरसीबीचा हा एका महिन्यातील पहिला विजय होता. अर्थात या विजयाने आयपीएलच्या पॉईंट टेबलमधील त्यांच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही, नऊ गेममधून फक्त चार गुणांसह आरसीबी अजूनही तळाशीच आहे. असं असूनही अजूनही आरसीबीला नेट रन रेटची चिंता न करता प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते, ते कसं? चला पाहूया..
नेट रन रेट विचारातही न घेता आरसीबी प्ले ऑफमध्ये?
सध्याची पॉईंट टेबलची स्थिती आणि राजस्थान रॉयल्स व सनरायजर्स हैदराबादचा फॉर्म पाहता पहिल्या दोन स्थानी आरसीबीला स्थान प्राप्त होणं अशक्यच वाटतंय. पण लीग स्टेजच्या शेवटी पॉईंट टेबलमध्ये ते किमान तिसरे किंवा चौथे स्थान मिळवू शकतील, यासाठी आरसीबीला त्यांचे उर्वरित पाच सामने जिंकावेच लागतील, असं झाल्यास ज्यामुळे त्यांना एकूण १४ गुण मिळतील, जे प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करण्यासाठी पुरेसे आहे. आणि संघाला नेट रन रेटचा विचारही करावा लागणार नाही.
तर आरसीबी चौथं स्थान गाठणार
आरसीबीला चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या पहिल्या तीन संघांची सुद्धा मदत लागणार आहे. जर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने प्रत्येकी दोन सामने गमावले आणि सनरायजर्स हैदराबादने एक सामना गमावला तर हे तीन संघ अनुक्रमे २२, २० आणि २० गुणांवर पोहोचतील, आणि अधिक १४ पॉइंट्ससह आरसीबीला चौथं स्थान पटकावणं शक्य होईल.
तर आरसीबी पोहोचेल तिसऱ्या स्थानी
पण, अगदी सगळं काही जुळून आलं तर आरसीबीला तिसरे स्थान मिळण्याची देखील अंधुक शक्यता आहे. यासाठी कोलकाता आणि हैदराबादचा फॉर्म बिघडल्यास मदत होऊ शकते. दोन्हीपैकी एका संघाने उर्वरित सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला तर त्यांचा खेळ १२ पॉईंट्सवर संपुष्टात येईल. आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या उर्वरित सहा सामन्यांमध्ये पाच विजयांसह २० गुणांची कमाई केल्यास, आरसीबी १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावरून प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल.
IPL Point Table 2024
हे ही वाचा<< हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
आरसीबी प्लेऑफ गाठण्याची शक्यता का आहे?
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादला ज्याप्रकारे पराभूत केले त्यावरूनच पुढचे टप्पे सुद्धा कदाचित त्यांना पार करता येतील अशी शक्यता वाटत आहे. त्यांचे पुढील दोन सामने सुद्धा लय हरवलेल्या गुजरात टायटन्स व पंजाब किंग्ससह आहेत. परिणामी थोडा जोर लावल्यास आरसीबी प्लेऑफ गाठू शकते. जर आरसीबीने घरच्या मैदानावर एक (वि GT) आणि धर्मशाला येथे दुसरा (वि PBKS) सामना जिंकला तर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध सामन्यांमध्ये त्यांना थोडा आत्मविश्वास व गती प्राप्त व्हायला सुद्धा मदत होऊ शकेल.