IPL 2025 Virat Kohli Fan Touches Feet in Match Video: आयपीएलच्या १८व्या हंगामाला दणक्यात सुरूवात झाली आहे. आरसीबीने गतविजेत्या केकेआरचा पराभव करत विजयाने मोहिमेचा श्रीगणेशा केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या पहिल्या सामन्यात आरसीबी संघाचे पूर्ण वर्चस्व दिसून आले, ज्यात त्यांनी ७ विकेट राखून विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला केकेआरने नक्कीच थोडा आक्रमक खेळ केला, पण आरसीबीने दणक्यात सामन्यात पुनरागमन केलं आणि विजय मिळवून शेवट केला.

आरसीबीने केवळ १६.२ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय नोंदवला. यामध्ये संघाचा चेस मास्टर विराट कोहलीने आपल्या ५९ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. या सामन्यात कोहलीने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करताच अचानक त्याचा एक चाहता मैदानात घुसल्याने खेळ काही काळ थांबवावा लागला. चाहता मैदानात घुसताच त्याने विराटसमोर थेट लोटांगण घातलं.

केकेआरने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीची नवी सलामी जोडी विराट कोहली आणि फिल सॉल्ट उतरली. ज्यांनी केकेआरच्या गोलंदाजांची पॉवरप्लेमध्येच धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची मोठी भागीदारी रचली. यामध्ये सॉल्टने ५६ धावा केल्या. तर विराट कोहलीने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विराटने अर्धशतक पूर्ण करताच संपूर्ण स्टेडिमयमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

विराट अर्धशतकाचं सेलिब्रेशन करण्यासाठी बॅट उंचावली आणि पुन्हा मैदानावर स्थिरावणार इतक्यात एका चाहत्याने मैदानात धाव घेतली. एक चाहता अचानक पिचच्या दिशेने धावत गेला आणि थेट विराटच्या पायाशी त्याने लोटांगण घातलं. यानंतर कोहलीने त्याला लगेच उचललं अन् चाहत्याने त्याला मिठी मारली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि पंचांनी त्याला सोडवत मैदानाबाहेर नेलं. मैदानाबाहेर जाताना तो चाहता विराटला भेटल्याचा आनंद साजरा करताना दिसला. ही घटना आरसीबी संघाच्या डावाच्या १३व्या षटकात घडली.

विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहता घुसला मैदानात (फोटो-एक्स)

आरसीबीने या सामन्यात केवळ १६.२ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत विजय नोंदवला. १७५ किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेंडूंच्या बाबतीत आयपीएल इतिहासातील आरसीबीचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबी संघाने अवघ्या १६ षटकांत २०१ धावा केल्या होत्या, ज्यात २४ चेंडू बाकी ठेवून विजय मिळवला होता.