Virat Kohli gave a befitting reply to the critics: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२३ ची धमाकेदार सुरुवात केली आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने बंगळुरुला १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. आरसीबीने या लक्ष्याचा विराट कोहली (नाबाद ८२) आणि फाफ डुप्लेसिस (७३) यांच्या खेळीच्या जोरावर सहज पार केले. या विजयानंतर कोहलीने आरसीबीच्या टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
आरसीबी संघाने आतापर्यंत आयपीएलच्या एकाही हंगामात आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले नाही. त्यामुळे या संघावर सातत्याने टीका होत असते. परंतु आता विराट कोहलीने मुंबईविरुद्धच्या विजयानंचर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मुंबई चेन्नईनंतर आरसीबीने सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले याचा कोहलीला अभिमान आहे.
मुंबई आयपीएलची सर्वात यशस्वी टीम आहे, ज्यांनी पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यानंतर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने चार विजेतेपद पटकावले आहेत. आरसीबीने जेतेपद जिंकले नसले, तरी पण त्यांनी १५ पैकी ८ हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आरसीबीने गेल्या सलग तीन मोसमात प्लेऑफमध्ये पाऊल ठेवले आहे.
आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करतोय –
मुंबईविरुद्धच्या शानदार विजयानंतर कोहली म्हणाला, “मला हे नमूद करायचे आहे की एमआयकडे ५ आणि सीएसकेकडे ४ विजेतेपद आहेत. जर मी चुकत नसेल, तर आमचा संघ तिसरा आहे, जो आतापर्यंत सर्वात जास्त ८ वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करून आणि संतुलित संघ बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू, जसे आम्ही मुंबईविरुद्ध केले होते.
यापेक्षा चांगला खेळ होऊ शकला नसता –
याशिवाय चार वर्षांनंतर आरसीबीच्या घरच्या मैदानावर सामना खेळल्यावर कोहलीने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला वाटते की हा एक मोठा विजय होता. चार वर्षांनी घरच्या मैदानावर खेळलो. यापेक्षा चांगला खेळ होऊ शकला नसता. स्टेडियम प्रेक्षकांनी भरले होते, जे आश्चर्यकारक होते. आम्ही येथे आलो तेव्हा प्रत्येक सीट भरलेली होती. हे खूप महत्त्वाचे आहे, आम्ही चांगली सुरुवात केली. चाहत्यांनी आम्हाला प्रेरित केले आणि त्यामुळे खूप फरक पडतो.”