विल जॅक्सने विराट कोहलीसोबत आरसीबीला मोठा विजय मिळवून तर दिलाच पण सोबतच त्याने आरसीबीला मोठ्या विक्रमास गवसणी घालण्यासही मदत केली. विल जॅक्सने ४१ चेंडूत १० षटकार आणि ५ चौकारांसह १०० धावा पूर्ण केल्या. संघाला एका धावेची गरज असताना विजयी षटकार लगावत विल जॅक्सने आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. पण या खेळीच्या सुरूवातीला जॅक्सला लय मिळत नव्हती तेव्हा विराटने कशी मदत केली आणि कशी साथ दिली, याबद्दल त्याने सामन्यानंतर सांगितले आहे.
जॅक्सने आयपीएलच्या इतिहासातील पाचवे जलद शतक झळकावले. पण सुरूवातीला जॅक्सने आपल्या या खेळीची संथ सुरुवात केली होती आणि लयीत यायला त्याला थोडा वेळ लागत होता. पण तेव्हा विराटने त्याला एकट्याने धावांची जबाबदारी घेतली आणि यामुळेच जॅक्सला लय शोधण्यात मदत झाली. सामनावीर ठरलेल्या जॅक्सने सांगितले की तो खेळीच्या सुरुवातीच्या धावांसाठी संघर्ष करत होता. कोहलीने त्याला साथ दिल्याने लय शोधण्याची संधी मिळाली.
जॅक्सने सांगितले की तो आणि कोहली दोन मोठी षटके शोधून सामना जिंकण्याचा प्रयत्न करत होते आणि मोहित शर्माविरुद्ध फटकेबाजी केली याबद्दल त्याने सांगितले. जॅक्स म्हणाले की तो फिरकीच्या विरूद्ध चेंडू ओव्हरहिट करण्याचा प्रयत्न करत होता.
हेही वाचा- IPL 2024: आरसीबीने गुजरातविरुद्ध रचला इतिहास, आयपीएलच्या इतिहासात हा पराक्रम करणारा ठरला पहिला संघ
सामन्यानंतर संवाद साधताना विराटने त्याला कशी मदत केली हे सांगताना तो म्हणाला, “फॅफ आणि विराटने आम्हाला खूप चांगली सुरुवात करून दिली. मी सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करत होतो, पण विराटने त्याची फटकेबाजी सुरू ठेवली आणि मला लय मिळवण्याची संधी मिळाली. टाईम आऊटमध्ये आम्ही चर्चा केली आणि ठरवलं दोन मोठी षटके शोधून संघाला विजय मिळवून देऊ. मी त्या घडीला सकारात्मक होण्याचा प्रयत्न करत होतो, कारण त्यापू्र्वी फिरकीसमोर मी संघर्ष करत होतो. मोहित शर्माच्या षटकात मी चांगली फलंदाजी केली आणि मग मी निश्चिंत झालो, स्वत:वर विश्वास ठेवत मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला.” असं जॅक्स म्हणाला.
विराटसोबत फलंदाजी करण्याबाबत तो म्हणाला, “विराटसोबत फलंदाजी करणं एक चांगला अनुभव होता. तो या खेळातील दिग्गज आहे आणि अनेकजण त्याच्या खेळी बघून शिकत असतात. त्याच्यासोबत मैदानात काही वेळ घालवता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्याकडून शिकण्याची मोठी संधी मला मिळाली. जेव्हा मी आयपीएलमधून पुढे जाईन तेव्हा मी शिकलेलं सर्व काही खेळामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.”