Virat Kohli KL Rahul Fight VIDEO IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स वि. आरसीबी यांचा दिल्लीच्या मैदानावर खेळवण्यात आलेला सामना चांगलाच अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी तगडी टक्कर देत शेवटपर्यंत लढत दिली, ज्यात अखेरीस आरसीबीने बाजी मारली. आरसीबी-दिल्लीचा सामना मागील सामन्याच्या निकालानंतर अटीतटीचा होईल याबाबात शंकाच नव्हती. पण हा सामना सुरू असताना विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात वाद झाला होता, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
दिल्लीने आरसीबीविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, बंगळुरूने पॉवरप्लेमध्ये लागोपाठ ३ विकेट्स गमावल्या, त्यानंतर विराट कोहली आणि कृणाल पंड्याने डावाची सूत्र हाती घेत शतकी भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण या सामन्यादरम्यान विराट आणि राहुलमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला.
विराट आणि कृणाल पंड्या फलंदाजी करत असताना दोन षटकांच्या दरम्यान स्ट्राईक घेण्यापूर्वी विराट आणि राहुलमध्ये वादावादी पाहायला मिळाली. कोहली नवीन षटकासाठी स्ट्राईकवर आला पण षटक सुरू होण्यापूर्वी तो थेट यष्टीरक्षक राहुलकडे गेला आणि त्याला काहीतरी विचारू लागला. राहुलने यावर उत्तर दिले आणि पुढच्या काही सेकंदांसाठी दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दोघांमधील हा वाद क्षणिक असला तरी त्याने लगेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
विराट आणि राहुलमधील वाद नेमका कशावरून झाला हे स्पष्ट नव्हते, परंतु यावेळी पंचांच्या निर्णयाचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात निश्चितपणे करण्यात आला. यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. सामन्यानंतर हे दोघेही मजा मस्ती करताना दिसले. या दोघांचा वाद घालतानाचा फोटो, व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ३९ चेंडूत ३ चौकारांसह सर्वाधिक ४१ धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने १८ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावांची खेळी केली. त्यामुळे प्रथम खेळताना दिल्लीने आठ विकेट्स गमावत कसाबसा १६२ धावांचा टप्पा गाठला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
फलंदाजीसाठी अवघड असलेल्या दिल्लीच्या खेळपट्टीवर विराट आणि कृणाल पंड्या सावध फलंदाजी करत आपली अर्धशतकं झळकावली. तर ११९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यामध्ये कृणाल पंड्याने २०१६ नंतर आयपीएलमध्ये दुसरं अर्धशतक झळकावलं. तर टीम डेव्हिडने ४ चेंडूत १९ धावा करत संघाच्य विजयावर शिक्कामोर्तब केला.