Virat Kohli New Record In IPL : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आधीपासूनच इंडियन प्रीमियर लीगचा इतिहासपुरुष बनला आहे. कोहली अशा स्थानावर आहे, जिथे त्याने काहीही केलं तरी त्याचा दर्जा उंचावणारच आहे. असाच पराक्रम गुरुवारी झालेल्या पंजाब विरुद्ध आरसीबीच्या सामन्यात कोहलीने केला आहे. कोहलीने जो पराक्रम केला आहे, त्याबद्दल विचार करता करता इतर फलंदाजांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. कोहलीने फाफ डु प्लेसिससोबत पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची भागिदारी रचली. यामध्ये त्याने ४७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार ठोकून ५९ धावा केल्या. कोहली स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात हरप्रीत बरारच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतु, या इनिंगमध्ये कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे.
दिल्लीविरोधात झालेल्या सामन्याआधी विराटने आयपीएल इतिहासातील २२९ सामन्यांच्या २२१ इनिंगमध्ये ३६.७२ च्या सरासरीनं ६,९०३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १२९.६३ इतका राहिला आहे. यामध्ये त्याचे ५ शतक आणि ४८ अर्धशतक सामील आहेत. परंतु पंजाबविरोधात खेळलेल्या ५९ धावांच्या खेळीमुळं विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
खरंतर आयपीएल इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. जेव्हा एखाद्या फलंदाजाने शंभरवेळा तीस किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा असा मोठा पराक्रम आहे, ज्याच्या जवळपासही जाणे इतर फलंदाजांसाठी आव्हानात्मक असणार आहे. कोहलीच्या या मोठ्या यशस्वी कामगिरीबद्दल त्याचे चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.