IPL 2025 Virat Kohli Mohammed Siraj Viral Video: आयपीएल २०२५ मधील आरसीबीच्या विजयी कामगिरीला गुजरात टायटन्सने लगाम घातला. सलग दोन सामन्यांमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या आरसीबीला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने आरसीबीचा ८ गडी राखून पराभव केला. गुजरातच्या या विजयाचा हिरो ठरला मोहम्मद सिराज, त्याने सामन्यात ३ विकेट घेतले. सामन्यादरम्यानचा विराट कोहली आणि मोहम्मद सिराजचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराज आरसीबीविरूद्ध सामन्याचा सामनावीर ठरला. पण यापूर्वी सामन्याच्या सुरूवातीला सिराज भावुक झालेला दिसला. विराट कोहलीला त्याच्या स्पेलमधील पहिल्याच षटकात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज अचानक थांबला आणि पुन्हा गोलंदाजीसाठी गेला. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वी ७ वर्ष आरसीबी संघाचा भाग असलेल्या सिराजने गुजरातकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्यानंतर सिराजने भावुक होण्याबाबत भाष्यही केलं.

आरसीबीविरुद्ध गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातकडून मोहम्मद सिराजने गोलंदाजीची सुरूवात केली. तर आरसीबीकडून सलामीसाठी विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी उतरली. सॉल्टने सिराजच्या चेंडूवर एक धाव घेत विराटला स्ट्राईक दिली. त्यानंतर सिराजने दुसरा चेंडू टाकायला सुरुवात केली तेव्हा समोर विराट कोहली होता. रनअपच्या आधीच सिराज मनाची तयारी करून गोलंदाजीसाठी सज्ज झाला.

सिराजने रनअप घ्यायला सुरूवात केली, पण बॉलिंग एंडला पोहोचण्याआधीच सिराज थांबला आणि तो पुन्हा मागे वळला आणि गोलंदाजीसाठी गेला, तितक्यात विराटदेखील खाली बघून मागे गेला. सिराज भावुक झालेला दिसला. विराट आणि सिराजचा हा भावुक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सिराजने त्यानंतर पुन्हा रनअप घेत चेंडू टाकला आणि विराटने त्या चेंडूवर चौकार लगावला. विराट-सिराज यांच्या व्हायरल व्हीडिओनंतर ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भावंड मिचेल मार्श आणि शॉन मार्श यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. एका लीगमध्ये खेळताना दोघेही भावंड प्रतिस्पर्धी होते, दरम्यान मिचेल चेंडू टाकणार इतक्यात शॉन मागे होतो, सिराज आणि विराटसारखाच हा व्हीडिओदेखील आहे.

व्हिडिओमध्ये सिराज आणि विराट यांच्यातील घटनेदरम्यान गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलच्या प्रतिक्रियेने त्याच्या हावभावांवरूनही तो प्रसंग किती भावुक करणारा होता, याचा प्रत्यय सर्वांना आला. मोहम्मद सिराज हा विराट कोहलीला त्याचा आदर्श मानतो. विराट आणि सिराज गेली अनेक वर्षे आरसीबी या संघातून खेळत होते. पण आरसीबीने आयपीएल २०२५ पूर्वी रिलीज केल होते आणि लिलावात गुजरात संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.

सामन्यानंतर सिराजला मैदानावरील घटनेबाबत विचारण्यात आले. त्याला विचारण्यात आले की तो भावुक का झाला होता? यावर तो म्हणाला की, “मी थोडा भावुक झालो होता. मी आरसीबी संघात गेली ७ वर्षे होतो. जर्सीचा रंग बदलेला पाहून मी थोडा सुरूवातीला भावुक झालो, पण माझ्या हातात चेंडू आल्यावर मी सावरलो.” मोहम्मद सिराजने आरसीबीविरूद्ध सामन्यात ४ षटकांत १९ धावा देत ३ विकेट्स घेतले आणि उत्कृष्ट कामगिरी करत संघाच्या विजयाची पाया रचला.