Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Highlights: आयपीएल २०२४ मधील ५२वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला. आरसीबीने १३.४ षटकांत हा सामना आपल्या नावे केला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो संघासाठी खूप प्रभावी ठरला. आरसीबीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत गुजराचतच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. दरम्यान, बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. त्याने गुजरात टायटन्सचा फलंदाज शाहरुख खानला रॉकेट थ्रोसह धावबाद केले.
गुजरात टायटन्सच्या डावातील १३वे षटक मोहम्मद सिराजने टाकत होता.त्याच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुल तेवतिया स्ट्राइकवर होता. तेवतियाने सिराजच्या चेंडूचा बचाव केला. विराट कोहली ३० यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. तेवतियाने चेंडू खेळताच शाहरूखने धाव घेतली, तोवर कोहलीने चेंडू पकडला होता.
विराटच्या रॉकेट थ्रो रनआऊटवर ग्रीनची भन्नाट रिअॅक्शन
विराट कोहली चेंडूच्या दिशेने येत असल्याचे शाहरूखने न पाहताच तो धाव घेण्यासाठी निघाला. पण विराट कोहलीच्या वेगवान थ्रोपासून तो वाचला नाही आणि धावबाद झाला. इतकंच नाही तर शाहरुख धाव घेत असताना मागे वळून पाहत राहुल तेवतिया त्याला काहीतरी बोलताना दिसला. तेवतिया त्याला सांगत होता आधी पुढे बघ पण तोवर विराटच्या रॉकेट थ्रोने त्याचा त्रिफळा उडवला होता. तर शाहरुख खानने २४ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या. विराटच्या या रॉकेट थ्रोवर ग्रीनची प्रतिक्रियाही भन्नाट होती. ज्याचा व्हीडिओही सध्या व्हायरल होत आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. निर्धारित २० षटकांत गुजरात टायटन्स संघ १९.३ षटकांत १४७ धावा करत सर्वबाद झाला. गुजरातकडून शाहरुख खानने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर बेंगळुरूकडून मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजय कुमार यांनी २-२ विकेट घेतले.