Virat Kohli Workout Video Viral : भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. मैदानात धावांचा पाऊस पाडणारा विराट क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालताना दिसत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात विराटने धडाकेबाज फलंदाजी करत नवीन विक्रम करण्याचा पराक्रम केला आहे. विराटला रनमशीन म्हणून संबोधलं जातं. कारण विराट त्याच्या पीळदार शरीरयष्टीमुळं मैदानात चित्त्यासारखा धावतो आणि धावांचा आलेख चढता ठेवतो. विराटच्या फिटनेसबाबत नेहमीच चर्चा होत असते. त्याच्या चाहत्यांनाही फिटनेसचं सिक्रेट जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. याच पार्श्वभूमीवर विराटने जिममधील व्यायाम करतानाच एक जबरदस्त व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
विराट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो आणि क्रिकेटसंबंधीत फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतो. विराट त्याची पत्नी अनुष्कासोबतचे फोटोही पोस्ट करत असतो. पण आता विराटने जिममध्ये कंबर कसल्याचा व्हिडीओ शेअर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. विराट जिममध्ये वेट लिफ्टिंग करत वर्कआऊट करताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विराटच्या या व्हिडीओला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
एका नेटकऱ्याने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, असं व्यायाम करणं सर्वांनाच जमणारं नाहीय. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, जे कुणी विराटला किंग मानत असतील त्या सर्वांनी या व्हिडीओला लाईक करा. अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, पुढील शतक ठोकण्यासाठी विराट कंबर कसत आहे. ‘किंग कोहली..’ असंही एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं. विराटचा हा जिममधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.