IPL 2025 Virat Kohli Statement on Bonding with Rohit Sharma: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स दरम्यान सामना रंगणार आहे. पण या सामन्याच्या पूर्वसंध्येला रॉयल चॅलेंजर्स संघाच्या अधिकृत ध्वनिचित्रफितीद्वारे कोहलीने साधलेल्या संवादामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील नात्याचीच अधिक चर्चा रंगली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वैयक्तिक संघर्ष असल्याची चर्चा अधूनमधून रंगत असली, तरी रविवारी विराट कोहलीने रोहितबरोबरचे आपले संबंध वर्षानुवर्षाचे असून ते सामायिक अनुभव, विश्वास आणि परस्पर आदराने बांधले गेले असल्याचे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्माबद्दल विराट कोहली म्हणाला, “इतकी वर्षे एकत्र खेळल्यानंतर एकमेकांबद्दल माहिती होणे साहजिक आहे. प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकत्र खेळल्यानंतर आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो, प्रगती कशी करायची याविषयी एकमेकांच्यात चर्चा झाली. सहवास वाढत गेल्याने एकमेकांना चांगले समजू लागलो आणि परस्परांविषयी असलेल्या विश्वास व आदरावर आमच्यातील नाते विस्तारले गेले,” असे विराट म्हणाला.
कोहली आणि रोहित दोघांनी २०००च्या दशकाच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. दोघांनी नंतर एकत्रित योगदान दिले. दोघांच्या कामगिरीचा परिणाम संघाच्या यशात परावर्तित होताना प्रत्येकाने पाहिला. एक वेळ अशी आली की दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे अविभाज्य घटक बनले. त्यांच्या एकत्रित भागीदाऱ्यांमुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपातील भारताने अनेक सामनेदेखील जिंकले.
या अखंडित प्रवासात आमचे नाते किंवा आमची भागीदारी फलंदाजीपलीकडे विस्तारली गेली, असेदेखील विराटने मान्य केले. “भारतीय संघाचे नेतृत्व करताना अनेकदा आमचे विचार आणि दृष्टिकोन यामध्ये एकरूपता आढळली. विशेषतः दबावाच्या परिस्थितीत आमचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी समान राहिला. संघाचे नेतृत्व करताना कायम कल्पनांवर चर्चा केली. परिस्थितीचा विचार करताना भावनिकदृष्ट्या आम्ही एकाच पानावर राहू, संघासाठी काम करायचे आहे आणि त्यासाठी विश्वास असणे आवश्यक आहे असाच आम्ही कायम विचार केला,” असेही कोहलीने सांगितले.
Virat Kohli on Rohit Sharma. ❤️pic.twitter.com/SnSxJKsAWS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 6, 2025
‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामातील प्रवासात दोन्ही संघांना गती घेणे आवश्यक आहे. अशा वेळी या कोहलीच्या वक्तव्याने दोन संघांदरम्यान होणाऱ्या सामन्याच्या चर्चेला भावनिक किनार लाभली हे निश्चित. आता या सामन्यात दोन्ही खेळाडू कसे कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.