Virat Kohli Doing This is My Ground Celebration in front of KL Rahul IPL 2025 Video: आरसीबीने दिल्लीच्या घरच्या मैदानावरच त्यांचा ६ विकेट्स आणि ८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. दिल्लीच्या फलंदाजीसाठी खडतर खेळपट्टीवर आणि दिल्लीच्या उत्कृष्ट गोलंदाजी युनिटसमोर विराट आणि कृणाल पंड्याने ११९ धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीने दिल्लीकडून मागील सामन्यातील पराभवाचा मोठा बदला घेतला आहे. या विजयानंतर विराट कोहलीने केएल राहुलच्या ‘हे माझं होम ग्राऊंड आहे’ या सेलिब्रेशनची नक्कल केली आहे. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
चिन्नास्वामीच्या मैदानावर १० एप्रिलला झालेल्या त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा घरच्या मैदानावर पराभव केला होता. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने सुरूवातीचे ३ विकेट्स गमावल्यानंतर केएल राहुलच्या ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या ९३ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर गाठलं होतं. दिल्लीने १७.५ षटकांत हे लक्ष्य गाठत आरसीबीचा मानहानीकारक पराभव केला होता.
दिल्लीच्या त्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेला केएल राहुल हा मूळचा बंगळुरूचा आहे आणि चिन्नास्वामी स्टेडियम हे त्याचं होम ग्राऊंड आहे. राहुलने त्या सामन्यात १५व्या षटकात गियर बदलत तुफान फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर केएल राहुलने मैदानावर बॅट उभी आपटत कांतारा स्टाईल सेलिब्रेशन करत हे माझं ग्राऊंड आहे म्हटलं होतं. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
विराट कोहलीने राहुलच्या This Is My Ground सेलिब्रेशनची केली नक्कल
विराट कोहलीने आता राहुलच्या या सेलिब्रेशनची नक्कल केली आहे. केएल राहुल सामन्यानंतर देवदत्त पडिक्कल, करूण नायर यांच्याबरोबर बोलत होता. तितक्यात मधून विराट कोहली आला आणि त्याने कांतारा स्टाईल सेलिब्रेशन केलं. राहुलने पहिल्या वेळेस पाहिलं नाही म्हणून विराटने परत सेलिब्रेशनची नक्कल केली, राहुलही ते पाहून हसू लागला आणि विराटने हसत हसत त्याला मिठी मारली. विराट आणि राहुलचा हा मजा मस्करी करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहलीच्या या नक्कलनंतर चाहते व्हीडिओ फोटो शेअर करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणत आहेत की विराट कोहली कधीच काही विसरत नाही आणि विजयानंतर त्याने हे सेलिब्रेशन करत बदला घेतला आहे. तर काही जण विराटच्या अॅक्टिंगचं कौतुक करत आहेत. तर काही चाहते विराट आणि राहुलच्या बॉन्डिंगबद्दल प्रशंसा करत आहेत.
आरसीबीने यंदाच्या मोसमातील प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील सर्व सहा सामने जिंकले आहेत. तर आतापर्यंत आरसीबीने १० पैकी सात सामने जिंकत सर्वाधिक १४ गुणांसह संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ चौथ्या स्थानी आहे.