IPL 2025 Virat Kohli U19 Teammate Umpire: आयपीएल २०२५ चा सीझन येत्या ३ दिवसांत सुरू होणार आहे. सर्वच चाहते आयपीएलमधील या १० संघांचं घमासान पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. पहिलाच सामना आरसीबी आणि केकेआर यांच्यात २२ मार्चला होणार आहे. विराट कोहलीचा संघ आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात खेळताना दिसणार आहे. दरम्यान विराट कोहलीचा अंडर-१९ संघातील सहकारी खेळाडू आयपीएलमध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहे.
विराट कोहलीबरोबर विश्वचषक जिंकणारा फलंदाज आता IPL 2025 मध्ये अंपायरिंग करताना दिसणार आहे. २००८ मध्ये भारताच्या अंडर-१९ संघाचे विश्वचषक जिंकल्यानंतर कोहली प्रसिद्धीच्या झोतात आला. कोहली व्यतिरिक्त, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे हे देखील विजयी संघाचा भाग होते, जे अजूनही सक्रिय खेळाडू आहेत. पण भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात सर्वात मोठी भूमिका तन्मय श्रीवास्तवची होती, ज्याने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक २६२ धावा केल्या होत्या. इतकंच नव्हे तर अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण ४३ धावांची खेळी केली होती.
कोण आहे विराट कोहलीचा हा वर्ल्डकप विजेता सहकारी खेळाडू?
या कामगिरीनंतरही तन्मयला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्याला आयपीएल २००८ आणि २००९ मध्ये पंजाब किंग्ज (तेव्हाचे किंग्ज इलेव्हन पंजाब) सोबत काही सामने खेळण्याची संधी मिळाली. पण जेव्हा भारतीय संघात संधी मिळाली नाही हे त्याला कळलं तेव्हा डावखुरा फलंदाज २०२० मध्ये वयाच्या ३०व्या वर्षी निवृत्त झाला.
व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, तन्मयने अंपायरिंगला सुरुवात केली आणि आता बीसीसीआयचा क्वालिफाई पंच बनल्यानंतर, तो आयपीएल २०२५ मध्ये अधिकारी म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासह, तो आयपीएलमध्ये खेळणारा आणि अंपायरिंग करणारा पहिला व्यक्ती बनणार आहे. ३५ वर्षीय खेळाडूला बीसीसीआयने दोन वर्षांत लेव्हल २ उत्तीर्ण केल्यानंतर, तो आयपीएलमध्ये ऑन-फिल्ड ड्यूटी करणार नाही. तन्मय उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असे, तन्मय आयपीएल २०२५ मध्ये पंचांच्या भूमिकेत दिसणार याची माहिती उत्तर प्रदेश क्रिकेटने फोटो पोस्ट करत दिली आहे.
निवृत्तीनंतर, तन्मय श्रीवास्तव केवळ त्याच्या अंपायरिंग परीक्षेची तयारी करत नव्हता, तर आरसीबीसाठी स्काउट, एनसीएमध्ये अंडर-१६ साठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यासारख्या इतर भूमिकाही तो निभावत होता.
तन्मय श्रीवास्तवने २००८ च्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये फक्त ६ सामन्यात ५२.४० च्या सरासरीने २६२ धावा काढणारा हा डावखुरा फलंदाज उत्तराखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळला आणि त्यांचे नेतृत्वही केले आहे. त्याने निवृत्त होईपर्यंत ९० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि ४९१८ धावा केल्या आहेत.

“मी ११ वर्षांचा असताना ग्रीन पार्क क्रिकेट हॉस्टेलमध्ये क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी सामील झालो, तेच माझे एकमेव ध्येय होते. १३ व्या वर्षी मी भारताचे अंडर-१५ संघाचे प्रतिनिधित्व केले आणि जेव्हा मी भारतीय संघाची जर्सी घातली तेव्हा ते स्वप्न पूर्ण झाले. २००८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक विजेते ठरलो आणि राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवतानाच्या आठवणी अजूनही अभिमान वाटणाऱ्यासारख्या आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंसह खेळल्याबद्दल आणि त्यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आजही त्यापैकी बहुतेक जण फक्त एका फोनच्या अंतरावर आहेत आणि मला शिकण्यास मदत करण्यासाठी त्यांचे अनुभव शेअर करत आहेत याबद्दल मी आबारी आहे,” व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेत तन्मय म्हणाला.