IPL 2024 CSK vs RCB Updates : आयपीएल २०२४ च्या हंगामाची सुरुवात एमोठ्या सामन्याने होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन बहुचर्चित संघ या मोसमातील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. सर्वांच्या नजरा आरसीबी संघावर असतानाच आता जानेवारीनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या विराट कोहलीकडे अधिक लक्ष असेल. विराटने नुकतेच दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे इंग्लंड मालिकेतून माघार घेतली होती. आता तो सीएसकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करू शकतो.
खरंतर, विराट कोहलीची उंची आता अशी झाली आहे की, जेव्हा तो मैदानात येतो तेव्हा कोणता ना कोणता विक्रम नक्कीच त्याची वाट पाहत असतो. आयपीएलच्या १७ व्या हंगामातील पहिल्या सामन्यातही असेच काहीसे घडणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने १ धावही केली तर तो एका खास विक्रमाची नोंद करणार आहे.
विराट कोहलीला खास विक्रम करण्याची सुवर्णसंधी?
विराट कोहलीने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एकूण ९९९ धावा केल्या आहेत. यामध्ये चॅम्पियन्स लीगच्या आकडेवारीचाही समावेश आहे. म्हणजेच या सामन्यात त्याने १ धाव काढल्यास तो सीएसकेविरुद्ध १००० धावा पूर्ण करेल. एवढेच नाही तर या डावात १५ धावा केल्या, तर तो एकट्या आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध १००० धावा पूर्ण करेल. म्हणजेच आतापर्यंत विराटने आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध ९८५ धावा केल्या आहेत. त्याच्या आधी आयपीएलमध्ये फक्त एकाच खेळाडूला अशी कामगिरी करता आली आहे.
सीएसकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज (केवळ आयपीएल) –
शिखर धवन- १०५७
विराट कोहली- ९८५
रोहित शर्मा- ७९१
दिनेश कार्तिक- ६७५
डेव्हिड वॉर्नर- ६४४
विराट कोहलीच्या आयपीएल रेकॉर्डवर एक नजर –
विराट कोहलीच्या आयपीएल विक्रमाबद्दल बोलायचे, तर तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. एवढेच नाही तर ७००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमधील २३७ सामन्यांच्या २२९ डावांमध्ये ७२६३ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये ५० अर्धशतकेही केली आहेत. त्याची सरासरी ३७.२ आहे आणि स्ट्राइक रेट १३० च्या वर आहे.
हेही वाचा – IPL 2024 CSK vs RCB: पहिलाच सामना धोनी विरूध्द कोहली, कशी असणार दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, करण शर्मा.